Folowers

सहा दिवसात वृद्धेला मिळाला न्याय, दावे निकाली काढण्यात ठाणे राज्यात अव्वल

 


ठाणे शहर, ता.13(बातमीदार) ठाणे सत्र न्यायालयात ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत इतिहास घडला आहे. एका पीडित वृद्धेला अवघ्या सहा दिवसात न्याय मिळाला. एवढ्या कमी दिवसात एखाद्या पक्षकाराला झटपत न्याय मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याने या निकालाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोबतच जिल्ह्यात भरवण्यात आलेल्या लोक अदालतीत 88733 दावे निकाली काढून ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राज्यात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश आर डी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही अदालत (ता.12) पार पडली.


ठाणे- पालघर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली आणि दाखल पूर्व दावे आपसात समेट घडून झटपट निकाली निघावेत याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. हे दावे निकाली काढण्यासाठी एक बसवण्यात आलेले आहेत 105 पॅनलच्या माध्यमातून विविध न्यायालयांमध्ये दाखल होऊ पाहणारे आणि न्यायासाठी प्रलंबित असलेले 88733 निकाली काढले. मोटार अपघाताच्या चार प्रकरणात अनुक्रमे 2,40,00,00, 2,00,00,00, 89,00,000 आणि 80,00,000 रुपयांची भरपाई मयतांच्या वारसांना देण्यात आली. समाधानाची आणि पहिल्यांदाच घडलेली बाब म्हणजे एका प्रकरणात 76 वर्षीय वृद्ध महिलेला अवघ्या सहा दिवसात न्याय मिळाला. अपघातात जखमी झालेल्या रेखा अहुजा यांनी 7 सप्टेंबर रोजी ई- प्रणालीच्या माध्यमातून भरपाई मिळण्यासाठी ऑनलाइन दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा अवघ्या सहा दिवसात (12 सप्टेंबर) निकाल देऊन पीडीतेला 6,20,000 रुपयांची भरपाई देण्यात आली. अहुजा यांच्यावतीने वकील सुहासिनी नावडकर यांनी बाजू मांडली. 


काय आहे ई- प्रणाली :

केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने देशातील न्यायालयांमध्ये पेपरलेस आणि ऑनलाईन झटपट निकाल लावण्यासाठी ई-प्रणाली सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ऑनलाईन दावा सब्मिट करून ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेतली जाते.


निकाली दावे :

प्रलंबित - 20631

दाखलपूर्व - 68102

एकूण निकाली - 88733


मोटार अपघात आणि इतर विविध आर्थिक प्रकरणात देण्यात आलेली भरपाई - 1,49,72,40,947 रुपये


राष्ट्रीय लोक अदालतिला पक्षकारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या अदालतीत दोन्ही पक्षकरांमध्ये आपसात समेट घडून प्रकरणे कायमची निकाली निघतात. दोन्ही पक्षकारांचा पैसा वेळ वाचतो. ठाणे आणि पालघर न्यायालयांमध्ये विक्रमी पद्धतीने दावे निकाली निघत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत