दफ्तर दिरंगाईविरोधात माजी महापौरांचा ठिय्या; उपायुक्तांच्या दालनाबाहेर नामफलकाला हार घालून निषेध
ठाणे, ता. ०९ - महापालिकेतील दफ्तर दिरंगाईविरोधात माजी महापौर अशोक वैती यांनी बुधवारी उपायुक्त गजानन गोदेपुरे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. नामफलकाला पुष्पहार घालून त्यांनी अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैती यांच्याकडून 'जनसंवाद' उपक्रम राबविला जातो. या माध्यमातून नागरिक व महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जातो.
मात्र वारसाहक्काच्या नोकरी व संवर्गातील प्रश्नांबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही केवळ उपायुक्तांच्या स्वाक्षरीअभावी प्रकरणे रखडल्याचा आरोप वैती यांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आंदोलन करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना नेत्या अनिता बिर्जे, ॲड. प्रियांका संगारे आदी उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरालाच आंदोलन करावे लागत असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींमधील समन्वयाचा अभाव चर्चेत आला आहे.

Post a Comment