Folowers

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध : महापौर शर्मिला पिंपळोलकर

ठाणे (03) : भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व असले की, व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणे सोपे होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध असल्याचे नमूद करीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


            ठाणे शहरातील विविध शाळांमधील भाषा विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक रमाकांत मढवी, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"आजचा दिवस प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अभिमानाचा आहे. भाषा विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविणे ही केवळ गुणवत्तेची नव्हे, तर जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि अभ्यासावरील निष्ठेची पावती आहे. या यशामागील विद्यार्थ्यांचे समर्पण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन निश्चितच कौतुकास्पद असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.


        आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धेत यश मिळविताना मानसिक ताण वाढण्याची शक्यता असते. यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच  शरिरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक विचार यांनाही तितकेच महत्व  द्यावे, निरोगा शरीर आणि सक्षम मन यांच्या बळावर जीवनातील मोठी उद्दिष्टे साध्य करता येत असल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केले.


           संस्कृत हा विषय अनेक विद्यार्थी स्कोरिंग विषय म्हणून निवडतात. मात्र मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दु या भाषा विषयामध्ये उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे यश तितकेच कौतुकास्पद आहे. दहावीतील हे यश महत्वाचे असले तरी भविष्यात बारावी, उच्च शिक्षण आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यावर अशीच उत्कृष्ट कामगिरी विद्यार्थ्यांनी करावी असे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नमूद केले.


            यावेळी उर्दु विषयात 97 गुण प्राप्त करणारी ठामपा शाळा क्र. 08 ची विद्यार्थीनी मंतशा अंदलीब मुबीन खान, संस्कृत विषयात 100 गुण प्राप्त केलेले स्राग्वी समीर बर्वे, शमिका वैभव कुलकर्णी, अंजली प्रवीण साठे, अवनी रविंद्र पेंडसे, मनस्वी गुरूनाथ पाल, अवनिश गजानन पोटे, हर्षिता अविनाश कदम, सायली गोविंद प्रसाद नेरुरकर, सोहम अनिल पंजाबी (सर्व विद्यार्थी आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यम शाळा, ठाणे ) रुची नरेश जैन (श्री मॉ बालनिकेतन) नील महाजन (सरस्वती सेकंडरी स्कूल ठाणे), इंग्रजी विषयात 96 गुण प्राप्त केलेले अवनी रविंद्र पेंडसे (श्री माँ बालनिकेतन), जागृती जितेंद्र चौधरी, किर्ती राजू बोंडाकुटे (क्रिएटिव्ह इंग्ल‍िश स्कूल) विराजित उत्तम फुंदे (सरस्वती सेकंडरी स्कूल), मराठी विषयात 95 गुण प्राप्त केलेले योगेश्वरी अभिजीत पोंक्षे, अनन्या अतुल वहाळकर  (भगवती विद्यालय), उर्वी केदार कुलकर्णी (सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे), कु. वैदेही विकास जगदाळे, शिवरुद्र राम सुर्यवंशी (ज्ञानपीठ विद्यालय), हिंदी विषयात 94 गुण प्राप्त करणारे श्रेया राजकुमार विश्वकर्मा (ज्ञानगंगा माध्यमिक हिंदी विद्यालय), हर्षदा हरिश्चंद्र यादव (भगवती विद्यालय) या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत