निलेश सांबरे यांच्या हस्ते कासा येथे दि. जव्हार बँकेच्या शाखा व एटीएमचे उद्घाटन
कासा (डहाणू, पालघर) | १ जुलै २०२६: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच दि. ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्री. निलेश सांबरे यांच्या हस्ते व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री. आनंद अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. जव्हार अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या कासा येथील नवीन शाखा क्रमांक ७ व एटीएम केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही शाखा परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारी ठरणार आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक तसेच स्थानिक नागरिकांच्या आर्थिक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण होतील, असे यावेळी विविध मान्यवरांकडून नमूद करण्यात आले.
याप्रसंगी जिजाऊ संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा उल्लेख करत श्री. निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात होत असलेले आर्थिक व सामाजिक परिवर्तन अधोरेखित करण्यात आले. सहकार क्षेत्र अधिक बळकट करून बँकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प श्री. निलेश सांबरे यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. निलेश सांबरे यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, आदिवासी, महिला, युवक व कष्टकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा जिजाऊ संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उद्घाटन सोहळ्यास बँकेचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सभासद, जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment