सलग दुसऱ्या दिवशी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केला घोडबंदररोडचा पाहणी दौरा
ठाणे, (02) : ठाणे शहरात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोड परिसरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना साचणाऱ्या पाण्याचा कोणताही त्रास होऊ नये व पाण्याचा निचरा तातडीने व्हावा यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पंप बसविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेवक संजय भोईर, सिध्दार्थ ओवळेकर, विक्रांत तांडेल अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, सहायक आयुक्त सोनल काळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम, रणधीर राणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्याची सुरुवात घोडबंदर रोडवरील कापूरबावडी येथील पेपर प्रॉडक्ट कंपनी परिसरातून करण्यात आली. या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाकडून तेथे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसविण्यात आले असून अतिवृष्टीच्या काळात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानंतर मानपाडा मेट्रो स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली. या परिसरात नाल्याचे रुंदीकरण करण्यात आल्यामुळे पाण्याचा निचरा सुरळीत होत असल्याचे दिसून आले. मात्र मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून तो तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश महापौरांनी एमएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले.
घोडबंदर रोडवरील आनंद येथील डी-मार्ट परिसराची पाहणी केली. या ठिकाणी मेट्रो विभागाने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त नाल्याची निर्मिती केली असून त्याचीही त्यांनी पाहणी केली. संबंधित यंत्रणांनी या नाल्याची नियमित देखभाल करून पाण्याचा निचरा सुरळीत होईल या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बाळकूम येथील महालक्ष्मी नगर परिसरातही पाणी साचलेले असल्याचे निदर्शनास आले. या परिसराच्या मागील बाजूस हायलॅन्ड परिसरात भिंत पडल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. सद्यस्थितीत या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असून ते युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच यासंदर्भात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांच्या कार्यालयास भेट देवून याबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर देखील उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी सर्व संबंधित विभागांना पावसाळ्यात संवेदनशील ठिकाणी सातत्याने लक्ष ठेवण्याच्या, पाणी साचताच तत्काळ निचऱ्याची व्यवस्था करण्याच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment