गावदेवी मंडई आगीचा धडा घेऊन मॉल-शॉपिंग सेंटरमध्ये फायर ऑडिट करा
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांची लक्षवेधी सूचना
ठाणे (प्रतिनिधी) : गावदेवी मंडईमध्ये लागलेल्या विध्वंसकारी आगीचा धडा घेऊन, ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मॉल, शॉपिंग सेंटर, सरकारी व महापालिकेच्या आस्थापना, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांचे फायर ऑडिट करावे. तसेच त्याबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी करणारी लक्षवेधी सूचना भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी महासभेपुढे सादर केली आहे.
गावदेवी मंडईच्या प्रवेशद्वारापुढील अतिक्रमणे,फेरीवाल्यांकडून मंडईतील जागेचा होणारा वापर, मंडईभोवती बेकायदा टपऱ्यांचा विळखा, अतिक्रमणांकडे स्थावर व मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष आदी मुद्द्यांबाबत भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी सातत्याने आवाज उठविला होता. तसेच गावदेवी मंडईला आग लागण्याची भीतीही व्यक्त केली होती. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. परिणामी गावदेवी मंडईतील संपूर्ण तळमजला खाक होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले. तसेच दोन जण शहीद झाले, याकडे संजय वाघुले यांनी लक्ष वेधले.
गावदेवी मंडईच्या आग प्रकरणातून धडा घेऊन महापालिकेने मंडईची पुनर्उभारणी करताना अग्निप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, गावदेवी मंडईत व्हेंटिलेशन होण्यासाठी प्रवेशद्वारावरील बेकायदा फेरीवाले हटवावेत, मंडईच्या इमारतीलगत उभारलेल्या बेकायदा टपऱ्या व गाळे जमीनदोस्त करावेत, यापुढील काळात मंडईत केवळ भाजी, फळे, किराणा, ड्रायफ्रूट आदी व्यावसायिकांना परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही लक्षवेधी सूचनेद्वारे करीत आहोत. तसेच यापुढील काळात गावदेवी मंडईसह महापालिकेच्या आस्थापना, मॉल, शॉपिंग सेंटर येथे नियमित फायर ऑडिट करावे. अन्यथा, संबंधित आस्थापना तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.
गावदेवी मंडईच्या परिसरात दोघा बेकायदा फेरीवाल्यांकडून महापालिका उपायुक्तांना मारहाण झाली होती. त्यानंतर या भागातील गाळे जमीनदोस्त करण्यात आले. कालांतराने पुन्हा गाळे बांधल्यावर तेथील रस्त्यावर मंडईच्या इमारतीलगत पुन्हा टपऱ्या उभारण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे, याकडेही लक्ष वेधून मंडईलगतचा परिसर मोकळा करण्याची मागणी संजय वाघुले यांनी केली आहे.

Post a Comment