ठाण्यात बोकडामुळे सापडली बोगस रिक्षा
वाहतुक पोलिसांच्या ई चलानमुळे बनावट नंबरची रिक्षा जप्त; चालकावर गुन्हा
ठाणे: बोकडामुळे बनावट रिक्षाचा पर्दाफाश करण्यात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. तीनहात नाका येथे वाहतुकीचे नियमन करताना एक गलेलठ्ठ बोकड घेऊन जाणाऱ्या रिक्षावर पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारला. हा ऑनलाईन दंड मूळ रिक्षाचालकाकडे गेल्याने तातडीने तो घटनास्थळी पोहोचला आणि एकाच नंबरच्या दोन रिक्षांचा कारनामा समोर आला. हा बनाव लक्षात येताच पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त करून रिक्षाचालका विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या तीनहात नाका सिग्नल येथे १५ जून रोजी दुपारी नौपाडा वाहतूक पोलीस निरीक्षक गौरी मोरे या पथकासमवेत दैनंदिन वाहतूक नियमन करीत होत्या. दरम्यान, घोडबंदर रोड दिशेकडील वाहिनीवर वाहतुक कोंडी झाल्याने पथकातील पोलीस नाईक जितेन्द्र पाटील, पोलीस हवालदार अभिजित भाट, चालक पोलीस शिपाई स्वानंद माने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले होते. तेव्हा, रिक्षामधून (MH 04 HZ 4290) प्रवाश्यांऐवजी बेकायदेशीरपणे बोकडाची सवारी नेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सदर रिक्षाचालकावर ई चलानची कारवाई करण्यात आली. ऑनलाईन दंड ठोठावताच काही वेळात मुंब्रा येथून एक रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन घटनास्थळी आला. आपली रिक्षा मुंब्रा येथे असताना मला दंड कसा काय आला ? अशी विचारपूस त्याने केली. त्यामुळे कारवाई करण्यात आलेली रिक्षा बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
डुप्लिकेट नंबर लावून रिक्षा व्यवसाय
वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान जमा असलेली रिक्षा आणि मूळ मालक यांच्या रिक्षाचे नोंदणी क्रमांक तपासले असता ते एकच आढळून आले. त्यानंतर रिक्षाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, मुंब्रा येथील शेर मोहम्मद शहा मोहम्मद यांचे वडिलांचे नावावर रिक्षा असल्याची खात्री झाली. सदर रिक्षावर डुप्लिकेट नंबर लावून रिक्षा चालवत असले बाबत उघड झाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment