सीएसआर निधीतून ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकांचे लोकार्पण
सीएसआर निधीतून ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकांचे लोकार्पण
ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास फर्स्ट क्रेडीट सर्व्हिसेस व इनरव्हील डिस्ट्रीक्ट यांच्या सीएसआर निधीतून दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज (04 एप्रिल) खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.
हा कार्यक्रम आज ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता बालसंगोपन अधिकारी वर्षा ससाणे, इनरव्हील क्लब 314 डिस्ट्रीक्टच्या अध्यक्षा लक्ष्मी सिंग, प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. छाया भडकमकर, सदस्य सुनीता जैन आदी उपस्थित होते.
खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर असताना या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नातून आणि विविध संस्थांच्या सहकार्याने या दोन रुग्णवाहिका महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आल्या. या दोन कार्डियाक रुग्ण्वाहिकाचा फायदा निश्चितच आरोग्य विभागाला होणार असून अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या रुग्णवाहिका आहेत. रोटरी क्लब, इनरव्हील क्लब यांनी कोविड काळातही ठाणे महापालिकेस चांगल्या प्रकारे सहकार्य केले असल्याचे नमूद करीत खासदारांनी इनरव्हील क्लब 314, फर्स्ट क्रेडीट सर्व्हिसेस यांचे आभार मानले.
या रुग्णवाहिका हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असून, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तात्काळ उपचार देण्यास सक्षम असून या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यास या रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी केले.

Post a Comment