भोंदू अशोक खरात प्रकरणातील मुख्य सुत्रधाराची चौकशी करुन कारवाई करा - पत्रकार अनिल ठाणेकर
ठाणे, नाशिक येथील भोंदू अशोक खरात याची सर्व पाळंमुळं पोलिसांनी खणुन काढली पाहिजेत व या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराची चौकशी करुन कडक कारवाई करण्यात यायला हवी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी डाॅ संदीप माने यांना निवेदन देताना केली. तसेच ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवावी अशीही विनंती केली. महा. अंनिस ठाणे शहर शाखेच्या या शिष्टमंडळात प्रधान सचिव अशोक मोहिते, संविधान जागर विभागाचे कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्र तिगोटे, घोडबंदर विभाग कार्यवाह, शेतकरी नेते किशोर भोईर, पत्रकार रत्नपाल जाधव, कळवा विभाग कार्यवाह प्रमोद तामसे, महिला विभाग कार्यवाह छाया ठाणेकर, युवा विभाग कार्यवाह संगिता जांभळीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.*
नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रूपात पाहणे ही मोठी चूक ठरेल. हे प्रकरण म्हणजे "सत्ता + संपत्ती + लैंगिक शोषण + बुवाबाजी” या धोकादायक संगनमताचे स्पष्ट उदाहरण आहे. समाजातील असुरक्षितता, भीती आणि विविध समस्यांचा गैरफायदा घेत, तथाकथित अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे व सामान्य लोकांचे शोषण कसे केले जाते, याचे हे गंभीर चित्र आहे. या प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की अशा प्रकारची बुवाबाजी एकट्या व्यक्तीच्या जोरावर उभी राहत नाही. त्यामागे सामाजिक मान्यता, आर्थिक स्वार्थ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संरक्षण असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता, त्याच्या मागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी निष्पक्ष आणि व्यापक तपास, अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जादूटोणा विरोधी कायद्यात फलज्योतिषाचाही समावेश करून त्यावर कायदेशीर नियंत्रण आणणे,
पीडित महिलांचे संरक्षण, राजकीय संबंधांची चौकशी, राजकीय आचारसंहिता, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समिती स्पष्टपणे सांगते की श्रद्धा ही वैयक्तिक असू शकते; परंतु श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण, फसवणूक आणि अत्याचार हे गुन्हे आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण दिले जाऊ शकत नाही. समाज, शासन आणि राजकारण या सर्वांनी मिळून अशा प्रवृत्तींचा निर्णायक अंत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, हीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ठाम भूमिका आहे, असे ठाणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी डाॅ संदीप माने यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment