ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन स्थानकाला `धर्मवीर आनंद दिघे स्थानक' नाव द्या : खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी
नवी दिल्ली - ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन स्थानकासाठी २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कडे शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केली होती. हा निधी अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केला असून तो प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्याने लवकरच स्थानकाचे काम मार्गी लागणार आहे. या स्थानकाला `धर्मवीर आनंद दिघे स्थानक' असे नाव देण्याची मागणी आज संसदेत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने केली.
संसदेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित २०२६-२७ या वर्षाच्या अनुदान मागणीवर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. २६ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानका दरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. काही काळ हे काम संथ गतीने सुरु होते आता या कामासाठी २५० कोटींचा निधी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मंजूर केला आहे. याबद्दल संसदेत खासदार नरेश म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांचे ठाणेकरांच्या वतीने जाहीर आभार मानत या नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे रेल्वे स्थानक नाव देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच ‘अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशनच्या मोठ्या दर्जाच्या अपग्रेडेशनचा प्रस्तावासाठी ९४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. तो प्रस्ताव मध्य रेल्वे विभागाने सादर केला आहे, परंतु तो रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित आहे. तो त्वरित मंजूर करावा अशीही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी लावून धरली.
ठाणे स्थानकावर गरिबांसाठी 'इमर्जन्सी मेडिकल क्लिनिक' पुन्हा सुरू करावे; कोविड दरम्यान बंद करण्यात आलेली 'ज्येष्ठ नागरिक सवलत' त्वरित सुरू करावी; जुलैमध्ये वेलंकणी स्पेशल ट्रेन, मुंबई (दादर) आणि चिपळूण दरम्यानची 'नमो भारत' किंवा एसी ट्रेन आणि ठाणे ते कसारा, कर्जत आणि खोपोली दरम्यानची 'शटल लोकल' यांची वारंवारता वाढवावी. दुरांतो एक्सप्रेसना पनवेल, कल्याण, ठाणे किंवा दादर येथे 'कमर्शियल हॉल्ट' द्यावा; ठाणे स्थानकाला मुलुंडकडे जाणाऱ्या प्लॅटफॉर्म १, ७ आणि ८ ला जोडणाऱ्या एफओबी आणि प्लॅटफॉर्म ५, ६, ७, ८, ९ आणि १० वर एस्केलेटरची तातडीने आवश्यकता आहे ते काम लवकर सुरु करावे, कळवा-ऐरोली एलिव्हेटेड लिंकचे काम जलद करावे आणि ठाणे स्थानकाचे प्लॅटफॉर्म सर्व गाड्यांसाठी १२ ते १५ कोच बसवण्यासाठी वाढवावेत; वाशी, बेलापूर, तुर्भे, ऐरोली आणि दिघा ही स्थानके सिडकोच्या अखत्यारीत आहेत, ज्यामुळे देखभालीच्या मोठ्या समस्या निर्माण होतात या स्थानकांचे अधिकार सिडकोकडून मध्य रेल्वेकडे तात्काळ हस्तांतरित करावेत; शिवाय, नवी मुंबई विमानतळ टर्मिनल कार्यान्वित होणार आहे, म्हणून पनवेल स्थानकापासून विमानतळापर्यंत विशेष रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करावी; भाईंदर (बीवायआर) आणि मीरा रोड (एमआयआरए) स्थानकांवरील प्रचंड गर्दी लक्षात घेता, चर्चगेटपर्यंत २-३ अतिरिक्त पीक अवर लोकल ट्रेन चालवल्या पाहिजेत; भाईंदर येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन प्लॅटफॉर्मची रुंदी किमान १० मीटर पर्यंत वाढवावी आणि तिकिट खिडक्यांची संख्या वाढवावी या आणि अशा अनेक मागण्या आज खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.

Post a Comment