flowers

पिसे ते टेमघर जलवाहिनीतून दिवसाला 12 कोटी लिटर पाण्याची चोरी उपमुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करणार - शानू पठाण

 


ठाणे -  पिसे डॅममधून एमआयडीसी, स्टेम आणि ठाणे महानगर पालिका जे पाणी उचलत आहेत. त्यापैकी सुमारे 12 कोटी लिटर पाण्याची दररोज चोरी होत असल्याचे विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांनी उघडकीस आणले. आमणे पाडा ते सवाद दरम्यान पत्रकारांसह पाहणी करून या पाणीचोरीचा पर्दाफाश केला. दरम्यान,  या पाणीचोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करणार असल्याचे शानू पठाण यांनी सांगितले. 


गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. या पाणीटंचाईमागे पाणीचोरी  हे मुख्य कारण असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार पठाण यांनी पहाटेच्या सुमारास पाणीचोरीच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी आमणेपाडा ते सवाद दरम्यान नगरसेविका मर्जिया पठाण आणि पत्रकारांसह पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीवरील व्हाॅल्ववर  जोडण्या करून नजीकच्या गोदामांना बेकायदेशीरपणे पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले तसेच या दोन जलवाहिन्यांच्या मध्ये मातीचा रस्ता तयार करून टँकरमध्ये पाणी भरले जात असल्याचेही उघडकीस आले. 


या संदर्भात विरोधी पक्ष नेते शानू पठाण म्हणाले की, पिसे डॅममधून दररोज 300 दशलक्ष लिटर्स पाणी ठाणे शहरासाठी उचलण्यात येत असते. हे पाणी टेमघर येथील शुद्धीकरण केंद्रात आणून पुढे ते ठाणे शहरात वितरीत करण्यात येते. पिसे ते टेमघर हे 17 किलोमीटर अंतर असून या दरम्यान  जलवाहिनीवर दर शंभर मीटरवर अनेक व्हाॅल्व असून या व्हाॅल्वला  4, 6, 8 इंचाची अनधिकृत जोडण्या करून त्याद्वारे पाणी चोरी करण्यात येत आहे. दिवसाला साधारणपणे 12 दशलक्ष लिटर्स पाणी चोरले जात आहे. ठाणेकरांच्या हक्काचे हे पाणी बेकायदेशीरपणे गोदामे, टँकरमाफिया चोरत असूनही ठामपा अधिकारी डोळे मिटून शांत आहेत. त्यामागे कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार होत आहे. या पाणीचोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करणार आहोत, असे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत