flowers

मराठी भाषा दिनी सचिन कुरेल यांचा प्रेरणादायी उपक्रम; ‘शिवचरित्रातून आम्ही काय शिकावे’ पुस्तकाचे वाटप

 


मराठी भाषा दिनानिमित्त माजिवडा प्रभागात प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच ठाणे–पालघर जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, माजिवडा प्रभाग अध्यक्ष श्री. सचिन कुरेल यांच्या वतीने “शिवचरित्रातून आम्ही काय शिकावे” या पुस्तकाचे नागरिकांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास केवळ भूतकाळ म्हणून न पाहता, त्यांच्या अद्वितीय चरित्रातून आणि ऐतिहासिक प्रसंगांतून जीवनासाठी आवश्यक असलेले शौर्य, धैर्य, राष्ट्रनिष्ठा, दूरदृष्टी व कर्तव्यपरायणता यांसारखे गुण आत्मसात करता यावेत, या उद्देशाने या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.


छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला स्वराज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देत परकीय भाषेची गुलामगिरी मोडून काढली. “स्वराज्याची भाषा ही रयतेची असावी” या विचारातून त्यांनी मराठी भाषेच्या पाठिशी राजसत्ता उभी केली. मराठी भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी शब्दकोशाची निर्मिती करून भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले.


आज आपण अभिमानाने मराठी बोलतो आणि मातृभाषेत संवाद साधण्याचे स्वातंत्र्य उपभोगतो, हे महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि भाषा-प्रेमाचे प्रतीक आहे. मराठी भाषा दिनानिमित्त नागरिकांनी शिवचरित्रातून भाषा-प्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि मूल्याधिष्ठित विचार आत्मसात करावेत, या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत