महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते ‘रेबीज मुक्त ठाणे’ मोहिमेचा शुभारंभ
ठाणे (२०): ठाणे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे महानगरपालिका व प्राणी मित्र संस्थांच्या वतीने विशेष ‘रेबीज मुक्त’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ व फलकाचे अनावरण आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महापालिकेत करण्यात आले.
यावेळी उपायुक्त मनिष जोशी, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका मीनल संख्ये मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर तसेच रेबीज मुक्त मोहिमेसाठी तयार करण्यात आलेले पथक उपस्थित होते.
‘रेबीज मुक्त ठाणे’ अशी ही योजना असून यासाठी 50 जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून 7 दिवसांत 5000 भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.
लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात केशरी रंगाचा रिफ्लेक्टर पट्टा बांधण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात 25000 भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून पुढील काळातही ही मोहिम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.

Post a Comment