राज ठाकरेंच्या झंझावाताने मनसेमध्ये संचारला उत्साह

 

 टेंभीनाक्यावर आनंद दिघेंना अभिवादन करून शिवसेनाप्रमुखांनी उद्घाटन केलेल्या शाखेलाही राज यांनी दिली भेट

 ठाणे :  ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात शाखा भेटीचा दौरा केला. राज ठाकरे यांच्या झंझावाती प्रचाराने मनसेच्या उमेदवारांसह महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह संचारला असुन प्रचार जोमात सुरू झाला आहे. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करताना राज यांनी टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. याप्रसंगी, शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, रविंद्र मोरे आणि शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते.

    ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे उमेदवार महायुतीला कडवी टक्कर देत आहेत. या आपल्या शिलेदारांचे मनोबल वाढवण्यासाठी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात आले होते.राज ठाकरे यांनी टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर, राज यांनी ठाण्यातील मनसेच्या शाखांना भेटी देऊन मनसे व शिवसेना (उद्धव ठाकरे) उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांचेही उदघाटन केले. या दरम्यान माजीवाडा येथून सुरुवात झालेल्या मनसेच्या बाईक रॅलीला युवावर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. ठाण्यातील रस्तोरस्ती तसेच प्रभागांमध्ये गुरुवारी राज ठाकरे आगे बढो, उद्धव ठाकरे आगे बढो, यासह "एकच ब्रँड ठाकरे ब्रँड" अशा घोषणांनी अवघे ठाणे दुमदुमून गेले. राज ठाकरे यांच्या या धावत्या दौर्‍यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून शिवसेना-मनसे उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे.

 शिवसेनाप्रमुखांनी उद्घाटन केलेल्या शाखेला दिली भेट

   हिंदुहृदयसम्राट दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या ठाण्याच्या चरई येथील शिवसेनेच्या शाखेलाही राज ठाकरे यांनी भेट दिली. तसेच, शाखेतील उपस्थित नोंदवहीत स्वाक्षरी देखील केली. १९८६ साली या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. याप्रसंगी, शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव तसेच जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते.

  ठाण्यात १२ जाने. रोजी दोन्ही ठाकरे गरजणार !


     ठाण्यातील मनसेच्या शाखांना भेटी देत मनसे व शिवसेना (उद्धव ठाकरे) उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांचे उदघाटन केल्यानंतर प्रसार माध्यमांना उद्देशुन राज ठाकरे यांनी, आज मी भाषणासाठी आलेलो नाही, तर माझ्या शिलेदारांचे आणि ठाणेकरांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे.तेव्हा, १६ तारखेला सर्व उमेदवारांनी गुलाल उधळत आले पाहिजे. असे नमुद करून येत्या १२ जानेवारीला माझी आणि उद्धव ठाकरेंची ठाण्यात सभा होणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत