ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मतदान जनजागृती अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी शहरातील विविध प्रभागांमध्ये स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मतदानाचा टक्का वाढावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीने दिलेला अधिकार बजावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. मिताली संचेती यांच्या सहकार्याने शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे
दिवा प्रभाग समिती अंतर्गत दातीवली तलाव येथे स्वीप पथकामार्फत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्यातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील सहभाग आणि जबाबदार मतदाराची भूमिका याविषयी प्रभावी संदेश देण्यात आला. या वेळी स्वीप पथकातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय मुंब्रा प्रभाग क्रमांक 26,30,31 व 32 मधील विविध ठिकाणी स्वीप टीममार्फत मतदान जनजागृती करण्यात आली. विशेषतः पेट्रोल पंप, बँका व भाजी बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
तसेच, स्वीप उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ भारतीय डाक विभागाच्या कळवा उपटपाल कार्यालय, प्रभाग क्रमांक २३ येथे घेण्यात आली. या कार्यक्रमास डाकघर प्रमुख श्रीमती शारदा पिल्ले मॅडम, कार्यालयातील कर्मचारी तसेच स्वीप पथकाचे सदस्य उपस्थित होते.
वागळे प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 16,17,18 मधील सि. पी. तलाव, शांतिनगर व मस्जिद गल्ली परिसरातील शाळांमध्येही स्वीप पथकाने भेट देऊन विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ‘मताधिकार’ अॅप विषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती फेरी काढून परिसरात नागरिकांनाही मतदानाबाबत जागरूक केले. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी 15 जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बजावावा, हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात येत आहे.

Post a Comment