पाचपाखाडी परिसर मतदानाच्या जनजागृतीने दुमदुमला

ठाणे - येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या  ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरातील विविध प्रभाग समित्यांअंतर्गत स्वीप (SVEEP) पथकाच्या वतीने रॅली, प्रभात फेरी, पथनाट्य व मतदान शपथ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  या उपक्रमांना नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.


            मतदानाचा टक्का वाढावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीने दिलेला अधिकार बजावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. मिताली संचेती यांच्या सहकार्याने शहरातील  विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे.


           पाचपाखाडी प्रभाग समितीतील सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाचपाखाडी येथे आज सकाळी (दिनांक ५ जानेवारी २०२६ ) रोजी सकाळी प्रभात फेरी काढून मतदान जनजागृती करण्यात आली.


           कचराळी तलाव परिसरातील निर्मलादेवी दिघे उद्यानात रॅली काढून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरात मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची जाणीव नागरिकांमध्ये अधिक दृढ झाली आहे. संध्याकाळी फिरण्यासाठी आलेले नागरिक, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “नक्की मतदान करा” आणि “माझे मत, माझा अधिकार” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.  निर्मलादेवी दिघे उद्यानातून रॅली काढून येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत