ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मतदान साहित्य भरण्याची प्रक्रिया सुरू
2013 मतदान केंद्रांवर 100 हून अधिक प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर लागणारे मतदान साहित्य भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी निवडणूक प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभागसमितीनिहाय एकूण 2013 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक असणारे 100 पेक्षा अधिक प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदार यादी, सील, शिक्के, शाई, मतदान नोंदवही, फॉर्म, लिफाफे, ओळख पट्टी, सूचना फलक, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा साहित्य, कोविड व स्वच्छता साहित्य यांचा समावेश आहे.
सदर साहित्याची तपासणी, मोजणी व वर्गीकरण करून संबंधित प्रभागनिहाय पॅकेट्स तयार करण्यात येत असून, प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्रपणे साहित्य भरण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी तसेच निरीक्षकांचे बारकाईने नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, तसेच मतदान कर्मचारी व मतदारांना आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शांततेत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.

Post a Comment