भीम अनुयायांसाठी विशेष सूचना – महापरिनिर्वाण दिनानिमित्त महत्वाची माहिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व भीम अनुयायी व भीम सैनिकांना एक महत्वाची सूचना व विनंती करण्यात येत आहे.
६ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशातील बहुजन समाजासाठी दुःखाचा व शोकाचा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे हजारो अनुयायी दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातात.
मात्र, प्रत्येक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चिंताजनक प्रकार सातत्याने दिसून येत आहे —
अनेक प्रस्थापित पक्षांचे इच्छुक उमेदवार बौद्ध बहुल भागांत मोफत ट्रक / बसची व्यवस्था करून अनुयायांना चैत्यभूमीकडे पाठवतात, गाड्यांवर आपापले बॅनर लावतात, परतीच्या मार्गावर बिस्कीट–केळी वाटप करून फोटो–व्हिडिओ काढतात, आणि नंतर सोशल मीडियावर याचा दिखावा करतात.
ही कृती भावनिक शोषण असून समाजाच्या श्रद्धेचा व वेदनेचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर आहे.
म्हणून सर्व भीम अनुयायांना आवाहन
1. कोणत्याही प्रस्थापित किंवा इच्छुक उमेदवारांसोबत फोटो काढू नये.
2. त्यांच्या बॅनर–पोस्टर असलेल्या वाहनांचा वापर टाळावा.
3. त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या बिस्कीट, केळी, पाण्याच्या बाटल्या इत्यादी खाद्यपदार्थ स्विकारू नयेत.
4. जर कोणाला खरंच समाजसेवा करायची असेल तर त्यांनी
निवडणुकीचा विचार बाजूला ठेवून,
थेट दादर शिवाजी पार्क किंवा चैत्यभूमी येथे देशभरातून आलेल्या भीम अनुयायांना वाटप करावे.
5. ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कल्याण व परिसरातील सर्व भीम अनुयायांनी आपल्या भागात होणारे असे वाटप पूर्णपणे नाकारावे.
समाजासाठी हीच खरी शपथ
आपल्या शोकदिनी कोणताही राजकीय दिखावा चालणार नाही.
सामाजिक स्वाभिमान जपूया, भावनिक शोषणाला नकार देऊया.
भीम अनुयायी समाज एकसंघपणे हा प्रकार थांबवेल.
ही विनंती सर्व संघटनांकडे, कार्यकर्त्यांकडे आणि अनुयायांकडे —
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सन्मान राखण्यासाठी एकत्रितपणे पाळण्याची नम्र अपील.
आपला
अशोक शिवलिंग कांबळे
(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे शहर जिल्हा महासचिव युवक आघाडी )

Post a Comment