सिकलसेल तपासणी करून घ्या – आरोग्य विभागाचे आवाहन


सिकलसेल जनजागृती सप्ताह : ११ ते १७ डिसेंबर २०२५

ठाणे -  (जिल्हा परिषद, ठाणे) — राज्यामध्ये सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सन २००८ पासून आदिवासी व दुर्गम भागात प्रभावीपणे राबविण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताह दिनांक ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.


उपक्रम जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे.


ठाणे जिल्ह्यात सध्या ११४ सिकलसेल रुग्ण असून १,८५७ वाहक आढळून आले आहेत. सिकलसेल जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २,८१० तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये २ वाहक व १ सिकलसेल बाधित रुग्ण आढळून आला आहे.


या जनजागृती सप्ताहाअंतर्गत नागरिकांमध्ये सिकलसेल आजाराविषयी माहिती व जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून, मोफत सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस व HPLC तपासणी, सिकलसेल रुग्णांना मोफत औषधोपचार, समुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण तसेच टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, सिकलसेल हा एक अनुवंशिक आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांमध्ये संक्रमित होतो. त्यामुळे विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहक-वाहक किंवा वाहक-रुग्ण विवाह टाळल्यास सिकलसेल आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकतो. तसेच सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर लवकरात लवकर गर्भजल तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


सिकलसेल रुग्णांसाठी शासनामार्फत विविध सवलती व लाभ देण्यात येत असून त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना अंतर्गत दरमहा ₹२,५०० आर्थिक सहाय्य, इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त वेळ, तसेच उपचारासाठी एस.टी. बस प्रवास सवलत यांचा समावेश आहे. सिकलसेल आजारावर पूर्णतः उपचार उपलब्ध नसले तरी योग्य औषधोपचार, नियमित तपासणी, समतोल आहार व आवश्यक काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येतो.


जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात सिकलसेल तपासणी करून घ्यावी तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत