आरोग्य प्रशासनात शिस्त, वेग व परिणामकारकता आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची ठाम भूमिका


आरोग्य समिती व कार्यकारी समितीच्या स्वतंत्र बैठकीत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा सर्वंकष आढावा

ठाणे (जिल्हा परिषद, ठाणे) — जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन अधिक शिस्तबद्ध, गतिमान व परिणामकारक करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी ठाम भूमिका घेतली असून, दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य समितीची बैठक व त्यानंतर कार्यकारी समितीची स्वतंत्र बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.


या दोन्ही बैठकींमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना, कार्यक्रम, उपलब्ध मनुष्यबळ, भौतिक व वैद्यकीय साधनसामग्री यांचा सखोल, वस्तुनिष्ठ व नियोजनबद्ध आढावा घेतला. जिल्ह्यातील आरोग्य सेवा केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत गुणवत्तापूर्ण स्वरूपात पोहोचली पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.


यावेळी असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, सिकल सेल, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, कुपोषण निर्मूलन तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया या महत्त्वाच्या आरोग्य कार्यक्रमांचा स्वतंत्रपणे आढावा घेण्यात आला. प्रत्येक कार्यक्रमात उद्दिष्टपूर्तीसाठी काटेकोर नियोजन, अंमलबजावणी व नियमित देखरेख बाबत आवश्यक सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.

सामान्य नागरिकांना सहज, सुलभ, वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची मूलभूत व सर्वोच्च जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, राज्यस्तरावर निश्चित करण्यात आलेल्या आरोग्य निर्देशांकांमध्ये ठाणे जिल्हा कोणत्याही परिस्थितीत मागे राहू नये, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे ठामपणे त्यांनी सांगितले.


*सिकल सेल जनजागृती अभियानाबाबत स्पष्ट व ठोस आदेश*

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिकल सेल जनजागृती अभियान राज्यासह ठाणे जिल्ह्यात दिनांक १५ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या अभियानांतर्गत ० ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांची सिकल सेल तपासणी करण्यात येणार असून, या वयोगटातील एकही पात्र लाभार्थी तपासणीपासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.

जिल्हा सिकलसेलमुक्त करण्याचा ठाम संकल्प व्यक्त करत, या अभियानासाठी काटेकोर नियोजन, क्षेत्रस्तरीय प्रभावी अंमलबजावणी व व्यापक जनजागृती अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामपातळीपासून शहरी भागांपर्यंत विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून अभियानाची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.


आयुष्मान भारत योजनेअंतर्गत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ततेचे निर्देश

बैठकीत एकत्रित आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे १०० टक्के वितरण पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने विशेष मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दिले.

या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मनीष रेंगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल राहुड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी संजय जाधव, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी गावडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमोल बाघ तसेच आरोग्य विभागातील इतर अधिकारी, जिल्हा समन्वयक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत