ठाण्यात राज्यनाट्य स्पर्धेला जल्लोषात सुरुवात
आर्टिफिशियल इंटेलिजन्सने घातलेल्या धुमाकूळात आणि येत्या दोन वर्षात त्यामुळे सिनेमा प्रामुख्याने मराठी सिनेमाचं काही खरं दिसत नाही अशा चर्चा अवतीभवती असताना त्याचा सर्वार्थाने प्रयोगशील अशा रंगमंचीय आविष्काराला कुठलाच धोका नसून नाटकाची जागा AI घेऊ शकत नाही असं प्रतिपादन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे अभिनेते व व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध उदय सबनीस यांनी व्यक्त केलं .
महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या , अनेक कलावंत आणि तंत्रज्ञांना व्यासपीठ देणाऱ्या ठाण्यात ६४ वी हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा २०२५-२०२६ ची प्राथमिक फेरी सोमवारपासून सुरू झाली.. १० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार असून सकाळी ११:३० वा. व संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सोमवारी अनेक मान्यवर व प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
६४ वर्षांचा इतिहास असलेल्या राज्यनाट्य स्पर्धेतून सिनेनाट्य क्षेत्राला गवसलेल्या चेहऱ्यांना कुठलंच आर्टिफिशियल तंत्रज्ञान टक्कर देऊ शकत नाही.. नाटक जिवंत आहे आणि तसंच राहील असं उदय सबनीस या प्रसंगी म्हणाले.. जगाच्या पाठीवर एवढी वर्षे अव्याहत अशी ही एकमेव नाट्यचळवळ सुरू आहे.. राज्यभरात विविध केंद्रात ४०० हून अधिक नाटके सादर होणार आहेत. याचं श्रेय संपूर्णपणे रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींना जातं असे ठाणे केंद्राचे स्पर्धा समन्वयक प्रफुल्ल गायकवाड यांनी सांगितले..
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे उदय सबनीस यांच्यासोबतच अभिनेत्री अमृता फडके , नाट्य परिषद ठाणे शाखा पदाधिकारी प्रणाली राजे , अभिनय कट्टा प्रमुख किरण नाकती , निर्माते संदीप विचारे , समीक्षक संतोष पाठारे आणि ठाणे केंद्राचे परीक्षक लेखक डॉ. समीर मोने , अभिनेत्री सौ. अनुया बाम , समीक्षक श्री. संजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेची सुरुवात अॅमॅच्युअर थिएटर, नागोठणे या संस्थेच्या ' ईश्वरसाक्ष ' नाटकाने झाली..

Post a Comment