ठाण्यातील मेट्रो ४ व ४-अ स्थानकांच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्याची मा. नगरसेविका सौ. नम्रता रवि घरत यांची मागणी
ठाणे - घोडबंदर रोडवरील मेट्रो ४ व ४-अ मार्गाची यशस्वी चाचणी नुकतीच पार पडली असून, या वर्षाअखेरीस हा महत्त्वपूर्ण प्रकल्प नागरिकांसाठी खुला होणार आहे. ठाणेकरांना वाहतूक कोंडीमधून दिलासा मिळवून देणारा हा प्रकल्प ही राज्य सरकारची दूरदृष्टी आणि ठोस नियोजन याचे प्रतिक आहे. त्याचवेळी यातील विजय गार्डन, गोवणीपाडा व गायमुख या स्थानकांच्या नावा मध्ये बदल करण्याची मागणी मा. नगरसेविका सौ. नम्रता रवि घरत यांनी शासनाकडे केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका सौ. नम्रता रवि घरत यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, परिवहन मंत्री श्री. प्रतापजी सरनाईक तसेच महानगर आयुक्त व एमएमआरडीए प्रमुख श्री. संजय मुखर्जी यांना स्थानकांच्या नावात बदल करण्यासाठी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात मेट्रो स्थानकांची विद्यमान नावे स्थानिक भौगोलिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळखीशी सुसंगत राहावीत, अशी ठाम मागणी केली आली आहे. त्यामध्ये विजय गार्डन - वाघबिळ, गोवणीपाडा - ओवळा व गायमुख - भाईंदर पाडा असा बदल सुचविला आहे.
मा. नगरसेविका सौ. नम्रता रवि घरत यांनी स्पष्ट केले की, मेट्रो स्थानकांना गावांची खरी नावे दिल्यास स्थानिक भूमिपुत्रांचा सन्मान होईल, त्यांच्या अस्मितेला न्याय मिळेल व जुनी महसुली गावे अधिकृत नकाशावर अधोरेखित होतील. यामुळे विकास आणि इतिहास यांचा सुंदर संगम साधला जाईल.
“या नावांच्या बदलामुळे कुणालाही हरकत असणार नाही. उलट, गावांची खरी ओळख व वारसा टिकून राहील. शासन व एमएमआरडीएने या मागणीचा सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा,” अशी अपेक्षा मा. नगरसेविका सौ. नम्रता रवि घरत यांनी व्यक्त केली आहे. सदर निवेदनाची दखल घेऊन सरकार व प्रशासनाने घोडबंदर रोड परिसरातील नागरिकांच्या भावनांना न्याय द्यावा, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.
सुचविलेली दुरुस्ती पुढीलप्रमाणे :
विजय गार्डन → वाघबिळ : विजय गार्डन ही केवळ सोसायटी असून प्रत्यक्षात वाघबिळ गावाच्या क्षेत्रात येते.
गोवणीपाडा → ओवळा : गोवणीपाडा हा फक्त पाड्याचा उल्लेख आहे, मात्र तो ओवळा गावाच्या हद्दीत मोडतो.
गायमुख → भाईंदर पाडा : गायमुख हे पूर्वीचे रेतीबंदर होते, परंतु आजचा भाग प्रत्यक्षात भाईंदर पाडा गावात येतो.

Post a Comment