‘कोकणरत्न पुरस्कार २०२५’ जाहीर , ठाण्यातील सदाशिव टेटविलकर, मेघना साने, राजेंद्र साळवी यांचा गौरव होणार
ठाणे - शेती, पर्यटन, मत्स आणि निसर्ग अश्या अनेक क्षेत्रात आपले कोकण जागतिक कीर्तीचे व्हावं यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ ठाणे आणि शिवसेना गटनेते व मा. नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदार संघामध्ये २६ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरदरम्यान रंगणाऱ्या कोकण महोत्सव २०२५ मध्ये यावर्षीचा प्रतिष्ठित ‘कोकणरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी ठाण्यातून सौ. मेघना साने, इतिहास अभ्यासक सदाशिव पांडुरंग टेटविलकर आणि राजेंद्र शशिकला मधुकर साळवी यांची निवड झाली असून १ नोव्हेंबर रोजी शनिवारी या महोत्सवाच्या विशेष सोहळ्यात त्यांचा गौरव केला जाणार आहे.
गत पाच दशकांपासून इतिहास, किल्ले आणि कोकण संस्कृती या विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे सदाशिव टेटविलकर हे ठाणे व कोकणाच्या इतिहासाचा जिवंत दस्तावेज मानले जातात. ‘दुर्गयात्रा’, ‘गड-किल्ल्यांचा जावे गावां’, ‘दुर्गांवरील वीरगाथा’ आणि ‘ठाणे – इतिहासातून भविष्याकडे’ या त्यांच्या ग्रंथांना रसिक वाचकांनी तसेच विद्वानांनी मोठी दाद दिली आहे. कोकण आणि महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी असंख्य संशोधन निबंध सादर केले असून, त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. मेघना साने यांनी ठाणे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. महिलांसाठी विविध उपक्रम, शिक्षण आणि कला यांचा संगम साधणाऱ्या त्यांच्या कामाचा विशेष गौरव करण्यात येत आहे. कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेच्या ६ वर्षे त्या अध्यक्ष होत्या. राजेंद्र शशिकला मधुकर साळवी गेली चार दशके ठाण्यात कर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मराठा मंडळ, ठाणेचे सरचिटणीस तसेच अखिल मराठा फेडरेशन आणि मराठा बिझनेसमन फोरमच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, उद्योजकता आणि सामाजिक एकात्मतेसाठी सातत्याने काम केले आहे. सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ, ठाणे आणि शिवसेना गटनेते व नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने हा अठरावा कोकण महोत्सव ठामपा शाळा क्र. १२०, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथे २ नोव्हेंबरदरम्यान सायं. ५ ते रात्री १० या वेळेत पार पडणार आहे.

Post a Comment