कल्याण शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवा माजी आमदार सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 


 

कल्याण :-   ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या कल्याण  शिळ महामार्गावर नेहमीच प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्याचा नोकरदार, विद्यार्थी, महिला, व्यावसायिक, जेष्ठ नागरिक सर्वांनाच त्रास सहन करावा लागत असून दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्राद्वारे केली आहे. त्यावेळी कल्याण शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असून संबंधित विभागाला त्वरित सूचना देण्यात येतील असे सांगितले आहे.

          कल्याण शिळ महामार्गावरील कल्याणफाटा ते पत्रीपूल तसेच नवी मुंबईकडून येताना महापे रोड आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाय जंक्शन ते कल्याणफाटा पर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे त्याचा प्रवाशांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.  कल्याण शिळ महामार्गावरून नवी मुंबई औद्योगिक वसाहतीकडे तसेच मुंबईकडे नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग ये - जा करीत असतो. सदर महामार्गावर रुग्णवाहिका देखील तासंतास अडकून पडतात. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. या महामार्गावर दररोज दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्यामुळे व्यापार व व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे कल्याण शिळ महामार्गावरील कल्याणफाटा ते पत्रीपूल तसेच महापे रस्ता आणि वाय जंक्शन ते कल्याणफाटा पर्यंतची वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत