ठाण्याच्या भ्रष्ट कारभारविरोधात शिवसेना, मनसेचा एल्गार
येत्या सोमवारी ठाणे पालिकेवर भगवे वादळ धडकणार
सत्ताधारी आणि पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढणार
ठाणे, प्रतिनिधी - ठाण्यातील दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, बेकायदा बांधकामे, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, क्लस्टर योजना झालेला फज्जा, काम न करता काढलेली बिले, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नांना ठाणेकर नागरीक अक्षरशः वैतागला आहे. या सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नाच्या आणि ठाणे पालिकेच्या भ्रष्ट कारभार विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारला आहे. येत्या सोमवारी (दि.१३ ऑक्टोंबर) रोजी ठाणे पालिकेवर भगवे वादळ धडकणार असून पालिका आणि एवढी वर्ष सत्तेत असणाऱ्यांचे वाभाडे काढण्यात येणार आहेत. या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगातन येथून संध्याकाळी ४ वाजता सुरूवात होणार आहे. ज्या ठाणेकरांना आपले सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचे आहे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.
शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज तीन हात नाका येथील टीप टॉप पार पडली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते, माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे माजी आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे महिला संघटक रेखा खोपकर मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, शहर प्रमुख अनिश गाढवे आदी जण उपस्थित होते. ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवणार आहेत. या मोर्चात जवळपास हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा ज्यांना ज्यांना कंटाळा आला आहे त्यांनी देखील या मोर्चात मनस्वी सहभागी व्हावे असे आवाहन राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.
पालिकेचे नाव बदला, मिंधे शाखा करा - राजन विचारे
गेल्या ३ वर्षाच्या कालावधीत ठाण्याची काय अवस्था झाली हे ठाणेकरांना माहीत आहे. २०१७ साली पालिका निवडणुक झाली, मात्र अद्याप निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे वाटेल तसा कारभार सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला. सध्या ठाणे पालिकेकडे झाकण बदलण्यासाठी पैसे नाहीत. शासनाचा निधी आणावा लागतो, पण या निधीचा लेखाजोखा कुठेच नाही. पालिकेला स्थापन होवून ४३ वर्ष झाली, याचे गिफ्ट ठाणेकरांना त्याच दिवशी मिळाले आहे. त्यामुळे ठाणे पालिकेचे नाव बदला, आणि मिंधे शाखा करा असा इशारा यावेळी विचारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
बाळासाहेबांनी ओरिजनल फौज ठाण्याच्या रस्त्यावर उतरणार - अविनाश जाधव
ठाण्यात दहशत प्रचंड वाढलेली आहे. आमच्याकडे प्रवेश करा, नाहीतर त्रास देऊ अशा धमक्या दिल्या जात आहेत. चुकीच्या पद्धतीने कामे सुरू आहेत. सत्ताधारी यांनी ठाणे बरबाद करून टाकले आहे, कामे करायची नाहीत, बिले काढायची असे यांचे धंदे झाले आहेत. सत्ता आल्यानंतर सर्व कामांची चौकशी आम्ही करू.
अधिकारी पाणी विकत आहेत. आता ठाण्यात दहशत चालणार नाही आणि आता यापुढे पैशावर नाही, कामावर निवडणूका होतील. तर बाळासाहेबांनी ओरिजनल फौज ठाण्याच्या रस्त्यावर उतरणार असल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले.
कायदा गेला चुलीत एकाही अधिकारी आम्ही सोडणार नाही
राज्यात सर्वात जास्त भ्रष्ट्राचार ठाणे जिल्ह्यात सुरू असून राजरोसपणे ठाणे लुटण्याचे काम सुरू आहे. त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. तसेच दुबार आणि बोगस नावांची पुरावे आम्ही दिले. त्यातील एकही नाव काढलेले नाहीत. तसेच प्रभागातील याद्या फिरवा फिरव झाल्यास कायदा गेला चुलीत एकाही अधिकारी आम्ही सोडणार नाही असा इशारा विचारे यांनी दिला.

Post a Comment