आरोग्य यंत्रणेत नियोजनाचा अभाव अवघ्या १०० मीटरमध्ये दोन आरोग्य केंद्रे!

 



ओपीडी सुरू झालेल्या आरोग्य मंदिरांची पाहणी केली असता ती बंद असल्याची बाब आमदार संजय केळकर यांना ठाणे पूर्वेत आढळून आली. तर आज कोलशेत येथे केलेल्या पाहणीत अवघ्या १०० मीटरमध्ये दोन आरोग्य केंद्रे आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेतच नियोजनाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.


ठाणे महापालिकेने दिलेल्या यादीनुसार आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात आरोग्य मंदिरांची पाहणी सुरू केली आहे. या पाहणी दौऱ्यात ठाणे पूर्वेत धोबी घाट, मीठ बंदर रोड आणि बारा बंगला भागात असलेले आरोग्य मंदिर बंद असल्याचे आढळून आले आहे. आज आमदार संजय केळकर यांनी कोलशेत वरचा गाव येथील आरोग्य मंदिराची पाहणी केली. यावेळी हे आरोग्यमंदिर देखील बंद असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे या आरोग्य मंदिरापासून 100 मिटर अंतरावर आधीच एक आरोग्य केंद्र सुरु आहे. एवढ्या जवळ एकाच ठिकाणी दोन आरोग्य केंद्रे म्हणजे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत नियोजन नसल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत श्री. केळकर यांनी संताप व्यक्त केला. 


यावेळी आ. केळकर यांच्या सोबत युवा मोर्चाचे सुरज दळवी, मेघनाथ घरत उपस्थित होते. 


महापालिका अधिकाऱ्यांनी माझ्याकडे जी यादी दिली आहे त्यामध्ये कोलशेतमधील हे आरोग्य मंदिर ओपीडी बेसिसवर सुरु असल्याचे दाखवले आहे, प्रत्यक्षात हे आरोग्य मंदिर बंद असल्याने महापालिकेने खोटी माहिती दिली. त्यामुळे ही लोकप्रतिनिधींचीच नाही तर करदात्या ठाणेकरांची घोर फसवणूक असल्याची टीका श्री. केळकर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत