ठाण्याचे हेअर स्टायलिस्ट ऋषील मोरे यांची गिनीजमध्ये नोंद




ठाणे: मुंबईतील नेस्को सेंटर येथे एका खाजगी (लोरियल) कंपनीतर्फे आयोजित भव्य हेअर कलर आणि स्टाईल या स्पर्धेत ठाण्याचे नामांकित हेअर स्टायलिस्ट, दि रिवायवल स्टुडिओचे मालक आणि ठाणे सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे समन्वयक ऋषील मोरे यांनी थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवत ठाण्याचे नाव उज्ज्वल केले. त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदमध्ये नोंद झाली. त्यांनी हेअर ट्रान्सफर्मेशन ही स्पर्धा २ तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण करुन एक नवा विक्रम नोंदविला. 


बुधवारी झालेल्या या स्पर्धेत एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित झाला. तब्बल ४२२ स्पर्धकांनी एकाच वेळी हेअर कलर आणि हेअर स्टाइल पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला.

आजवर इतक्या मोठ्या प्रमाणावर अशी स्टायलिंग स्पर्धा कधीच झालेली नव्हती असे ऋषील यांनी सांगितले. 

या विक्रमात ठाण्याचे ऋषील मोरे हे ठाणे जिल्ह्यातील एकमेव हेअर आर्टिस्ट म्हणून सहभागी झाले, ही ठाणेकरांसाठी विशेष अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेसाठी तीन तासांचे आव्हान देण्यात आले होते मात्र, ऋषील यांनी केवळ २ तास १५ मिनिटांत संपूर्ण हेअर ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण करून परीक्षक आणि प्रेक्षकांना थक्क केले. त्यांच्या वेगवान, अचूक आणि क्रिएटिव्ह कामगिरीने त्यांची कौशल्याची छाप अधिक उठून दिसली. देशातील ४२२ जणांच्या नावाची या विश्वविक्रमात नोंद झाली असून या उपक्रमात ठाण्याचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या ऋषील मोरे यांची ही कामगिरी संपूर्ण ब्युटी आणि सलून इंडस्ट्रीतील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

त्यांच्या या यशाने ठाणे जिल्ह्यातील नवोदित हेअर आर्टिस्टसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सौंदर्यशास्त्रात कौशल्य आणि वेग यांचा अद्वितीय संगम सादर करून ऋषील मोरे यांनी ठाण्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले आहे—हे प्रत्येक ठाणेकरासाठी खऱ्या अर्थाने अभिमानाचे क्षण आहेत!

केसांचा जादूगार ऋषील मोरे

स्पर्धेचे आव्हान होते—फक्त तीन तासांत संपूर्ण हेअर ट्रान्सफॉर्मेशन, यामध्ये केस धुणे, हायलाइट करणे  आणि हेअर स्टाईलिंग ही तीनही कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते असा अनुभव त्यांनी सांगितला. 

स्थानिक ते जागतिक प्रवास

सलून इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केलेले ऋषील मोरे हे दि रिवायवल स्टुडिओचे मालक असून, हेअर स्टाईल आणि कलरिंगमधील त्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रांसाठी ओळखले जातात.

जागतिक मंचावर मिळवलेला हा सन्मान त्यांच्या मेहनतीचा, समर्पणाचा आणि कलाकारीचा ठोस पुरावा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत