स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात ठाणे महापालिकेची महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरे

 


बुधवार, १७ सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनपर भाषणाचे होणार थेट प्रक्षेपण

अभियानाची ठाण्यातील सुरूवात लोकमान्य टिळक नर्सिंग होम, कोरस रुग्णालय येथून होणार


           ठाणे  : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' या अभियानाअंर्तगत ठाणे महापालिकेतर्फे महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या काळात राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची ठाण्यातील सुरूवात बुधवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून वर्तकनगर येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होम (कोरस रुग्णालय) येथून होणार आहे.


          स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबांचे, समाजाचे आणि अखेरीस संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो. त्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ बुधवार, १७ सप्टेंबर रोजी इंदौर, मध्य प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या समारंभाचे थेट प्रक्षेपण लोकमान्य टिळक नर्सिंग होम, कोरस रुग्णालय येथे  करण्यात येणार असून त्यास लोकप्रतिनिधी, डॉक्टर, आरोग्यसेविका आदी उपस्थित राहणार आहेत.


         *महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात शिबिरे*


         ठाणे महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत होणाऱ्या आरोग्य शिबिरांमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.  


        *याची होणार तपासणी, होणार समुपदेशन*

        

        उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, ह्दयरोग आदी असंसर्गजन्य रोगांचे तपासणी शिबीर, नेत्र तपासणी, दंत तपासणी, माता व बाल आरोग्य शिबीर, महिला व बालकांसाठी पोषण जागरुकता सत्रे, आयुष आणि योग शिबिरे, क्षयरोग जागरुकता आणि तपासणी शिबिरे, रक्तदान शिबीर, अवयवदान प्रतिज्ञा, मोफत औषध वितरण, मानसिक आरोग्य समुपदेशन, व्यसनमुक्ती शिबीर, किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी रक्तक्षय तपासणी आणि समुपदेशन, क्षयरोग तपासणी, सिकलसेल रोग तपासणी यांचे आयोजन सर्व नागरी केंद्र येथे करण्यात येणार आहे.


       महिला व बालक यांना लाभ घेण्याचे आवाहन


       स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात होणाऱ्या आरोग्य शिबिराचा लाभ शहरातील सर्व महिला तसेच गरोदर माता व सर्व लहान बालकांन होणार असून त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत