शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यरत १०० कंत्राटी विषय शिक्षकांना कायम नेमणुकीचे आदेश

 

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आदेश वितरित

 (जिल्हा परिषद, ठाणे) – ठाणे जिल्ह्यातील विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय गरजांची पूर्तता करण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षण उपक्रम (Inclusive Education) राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत २००४ पासून मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या विषय शिक्षक व विशेष शिक्षकांना आज एक महत्त्वाचा टप्पा गाठत कायम नेमणुकीचे आदेश वितरित करण्यात आले.


         जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील आज, दि. २४ सप्टेंबर, २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात एकूण १०० विषय शिक्षकांना "विशेष शिक्षक" या कायमस्वरूपी पदावर नेमणुकीचे आदेश प्रदान करण्यात आले.


         यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. रोहन घुगे यांनी शिक्षकांचे अभिनंदन करताना सांगितले की, “दिव्यांग व विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांचे शिक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कायमस्वरूपी पदावर नेमणुकीमुळे शिक्षकांचा आत्मविश्वास दुणावेल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी निश्चित होईल.”


          तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “या आदेशामुळे ठाणे जिल्ह्यातील विशेष गरजा विद्यार्थ्यांना नियमित शैक्षणिक सहाय्य आणि आवश्यक सुविधा मिळतील. शिक्षकांनी आपला उत्साह आणि निष्ठा कायम ठेवून या उपक्रमाला गती द्यावी.”

शासनाचा निर्णय व पार्श्वभूमी

राज्यातील दिव्यांग व विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्रमांक १३२/२०१६ नुसार शासनाने दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रत्येक केंद्रशाळेत एक विशेष शिक्षक या हिशोबाने एकूण ४ हजार ८६० पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

यानुसार आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी ११ जून २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत कार्यरत ३७ जिल्हा समन्वयक शिक्षक व विशेष तज्ञ तसेच महानगरपालिका स्तरावरील कर्मचारी व बृहन्मुंबईतील शिक्षक यांचे समायोजन करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील अंमलबजावणी

आज ठाणे जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील १०० केंद्रशाळांमध्ये एकूण १०० विषय शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. या सर्व शिक्षकांना "कायमस्वरूपी विशेष शिक्षक" या पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले.


           या आदेशामुळे ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग व विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, समावेशित शिक्षण उपक्रमाला नवे बळ मिळाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत