पालकांनी पाल्यांचे मित्र बनावे - न्या. पाजणकर
ठाणे : कोणी लैंगिक छळ करीत असेल, त्याच्यावर अत्याचार केले असतील तर ते सांगताना त्याला आपले भय, संकोच वाटता कामा नये. यासाठी पालकांनी त्यांच्या सोबत मित्रत्वाचे नाते निर्माण करायला पाहिजे. असे झाले तर त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत ते पालकांशी अधिक लवकर आणि निर्धास्तपणे बोलू शकतील. त्यामुळे गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळण्यासाठी विलंब होणार नाही असे प्रतिपादन ठाणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रवींद्र पाजणकर यांनी केले. ते शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित केलेल्या " जागरूक पालक, सुरक्षित मुले ' या कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते.
ठाणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, मुंब्रा पोलीस आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या सहकार्याने "जागरूक पालक, सुरक्षित मुले" या थीम अंतर्गत मुंब्रा येथे पोक्सो जागरूकता कार्यक्रमाचे नुकतेच (ता.29) आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुंब्र्यातील डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल, अल हिदायाह पब्लिक स्कूल आणि कौसा इंग्लिश स्कूलमधील 700 हुन अधिक पालक सहभागी झाले होते. यावेळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका साबके, वकील तृप्ती पाटील, राईट वे संस्थेचे सईद खान, ग्लोबल केअर फाउंडेशनचे विश्वस्त आबिद अहमद कुंडलम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आपले मुल सुरक्षित राहिले पाहिजे, असे सर्वांना वाटते. त्यासाठी आपले मुल जेव्हा बालावस्थेत असेल तेव्हा त्याला गुड तच, बॅड टचची शिकवण द्यायला पाहिजे. किशोरवयीन वयात त्यांना समजून घेत त्यांच्यासोबत मित्रा प्रमाणे वागले पाहिजे. ते मोबाईलमध्ये काय पाहताहेत, त्याच्या वागण्यात कोणते बदल होताहेत याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पालकांसोबत कोणतीही गोष्ट शेअर करताना त्यांना संकोच, भय वाटता कामा नये असे विश्वासाचे नाते निर्माण करायला पाहिजे. पालक जागरूक असला की मुलं सुरक्षित असतात. असे मार्गदर्शन विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश रवींद्र पाजणकर यांनी केले. तसेच जिल्हा विधिसेवा प्राधिकरण सर्व घटकांसाठी, विशेषतः मुलांच्या हक्क आणि संरक्षणाशी संबंधित बाबींमध्ये कायदेशीर जागरूकता आणि न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही न्या. पाजणकर म्हणाले.
Post a Comment