कुरुक्षेत्र ते कारगिल पुस्तक प्रकाशन सोहळा
रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ च्या पावसाळी संध्याकाळी खारकरआळी ठाणे येथील समारोह बॅंक्वीट हॉलमध्ये अवघ्या मान्यवरांची मांदियाळी अवतरली होती.
औचित्य होते प्रसिद्ध लेखिका श्रीमती नयना सुधीर वैद्य यांच्या "कुरुक्षेत्र ते कारगिल" ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे.
सन्मानीय ब्रिगेडियर श्री संग्राम दळवी(निवृत) सन्मानीय कर्नल श्री मेघन देशपांडे, सन्मानीय वीरमाता श्रीमती अनुराधाताई गोरे, प्रकाशक आणि अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष श्री समीर गुप्ते आणि उत्सवमूर्ती श्रीमती नयना सुधीर वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन प्रकाशन सोहळ्याची सुरुवात झाली. नयनाताईंनी मान्यवरांचे स्वागत करुन सत्कार केले.नंतर प्रास्ताविक मांडले.
आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या की कुरुक्षेत्र ते कारगिल हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला आईकडून मिळाली. ती आम्हाला अनेक ऐतिहासिक कथा सांगत असे त्यातून इतिहासाची ओढ निर्माण झाली. या पुस्तक लेखनासाठी मी २५ वर्ष झटत होते. त्यासाठी अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला आणि गुगल, विकिपीडियाचाही आधार घेतला.
नयनाताईंच्या ओघवत्या शैलीतील मनोगतानंतर समीर गुप्ते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नयनाताईंच्या ह्या पुस्तकावर काम करीत असता मला असं वाटलं की माझ्या हातून जणूं लोकोपयोगी कार्य घडतंय कारण पुढील पिढीला आपला इतिहास कळल्यावर निश्चितच फायदा होईल.
सगळ्यांना उत्सुकता होती प्रकाशनाची. शुभा देशपांडे यांच्या कल्पकतेतून साकारलेले कुरुक्षेत्र ते कारगिल हे पुस्तक व्यासपीठावर आणण्यात आले.
ब्रिगेडियर संग्राम दळवी यांच्या शुभहस्ते अतिशय दिमाखात प्रकाशन सोहळा संपन्न झाला
या पुस्तकाचं मुखपृष्ठ केलेल्या श्री विजयराज बोधनकरांचा आणि सुप्रसिद्ध कवयित्री- लेखिका श्रीमती अनुपमा उजगरे यांचा सत्कार नयनाताईंनी केला.
भारतीय वायुदलाचे कारगील युध्दातील प्रमुख एअर चीफ मार्शल श्री अनील टिपणीस यांनी नयनाताईंना पत्राद्वारे पाठवण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
त्यानंतर कर्नल मेघन देशपांडे यांनी आपल्या भाषणातून ते पूर्वी कार्यरत असलेल्या सियाचल ग्लेशियर्सवर शत्रूशी मुकाबला करतांनाचे चित्तथरारक अनुभव सांगितले. उणे ८० तापमान असलेल्या ठिकाणी झूंज देण्यासाठी रोमरोमात देशप्रेम असणंच आवश्यक आहे याची प्रचिती ऐकतांना आली. त्या भागातील खडानखडा माहिती आणि आपल्या दलातील सैनिकांनी खडतर परिस्थितीवर कशी मात केली हे कर्नल यांनी सांगतांना सारं सभागृह भारावून गेलं होतं.
सोहळ्याच्या प्रमुख वक्त्या आणि एका वीरमातेला ऐकायला आता सारे उत्सुक होते. अनुराधाताई गोरे…भारत पाकिस्तान युध्दात वीरगती प्राप्त झालेल्या कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्रींचा शब्दन् शब्द थेट काळजाला भिडणारा होता. नयनाताईंच्या पुस्तकाबद्दल तर त्या भरभरुन बोलत होत्या. युध्दकथा ह्या वाचकांच्या/ श्रोत्यांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या असतात. पण सामान्य नागरिक हा याबाबत उदासीन असतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही उदासिनता आपल्या राष्ट्राला महागात पडू शकते असं त्या पोटतिडकीने सांगत होत्या. अवघं सभागृह मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतं.
ब्रिगेडियर संग्राम दळवी आपले विचार मांडण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले की युध्दाचं महत्व सामान्य माणूस जाणतच नाही. याचं कारण आपल्याला योग्य इतिहास शिकवलाच गेला नाही. आजच्या पिढीला तर तो माहितच नाही. दळवी सर पार प्राचिन काळापासून बोलत होते. सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक, सगळी साम्राज्यं, शिवकाल, पेशवेकाळ, ब्रिटिशकाळाचा इतिहास मुखोद्गत होता त्यांना. दळवींचे अफाट ज्ञान आणि स्मरणशक्ती पाहून श्रोते अवाक् झाले होते.
नयनाताईंच्या पुस्तकाचं त्यांनी विशेष कौतुक केलं. कुरुक्षेत्र ते कारगिल हे पुस्तक आजच्या पिढीसाठी महत्वपूर्ण आहे, मार्गदर्शक आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले.
मान्यवरांची उद्बोधक विचारधारा ऐकण्यात श्रोत्यांची एक संध्याकाळ सत्कारणी लागली. निवेदिका सौ. अरुणा कर्णिक यांनी सुंदरपणे सूत्रसंचालन केले. नयनाताईंनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment