दापोली तालुक्यातील 48 गावांच्या विकास योजनांचा सखोल आढावा
मा. राज्य मंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
दापोली: दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि स्थानिक समस्या तातडीने सोडविण्यासाठी आज आडे फाटा येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मा. राज्य मंत्री श्री. योगेशदादा कदम अध्यक्षस्थानी होते.
ही बैठक केळशी जिल्हा परिषद गटातील एकूण 48 गावांसाठी आयोजित करण्यात आली होती. बैठकीस दापोली प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे, तसेच कृषी, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, वन, जिल्हा परिषद, आरोग्य, गृह, परिवहन, पुरवठा इत्यादी विभागांचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध विभागांच्या योजनांचा आणि प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महसूल विभागाकडून सामाजिक अनुदान योजना, जिवंत सातबारा मोहीम, ऍग्रीस्टॅक प्रकल्प याविषयी प्रगती अहवाल सादर झाला. पुरवठा विभागाने रेशन वितरण व्यवस्थेतील अडचणी आणि लाभार्थ्यांना वेळेवर धान्य उपलब्ध करून देण्यासाठीचे उपाय स्पष्ट केले. आरोग्य विभागाने आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करण्याचे नियोजन मांडले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून नळपाणी योजनांतील प्रलंबित कामे व पाणी स्रोतांचे संवर्धन याबाबत माहिती देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने गावांतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व सुधारणा यासंबंधीची कामे मांडली. ऊर्जा विभागाकडून आभा योजना आणि वीजपुरवठा सुधारणा उपायांची माहिती देण्यात आली.
ग्रामस्थांनी बैठकीदरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यावर मा. मंत्री महोदयांनी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले की, लोकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत विलंब न होता पोहोचाव्यात. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी समन्वयातून काम करावे.
या बैठकीस परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
ग्रामस्थांनी ही बैठक फलदायी ठरल्याचे सांगत मा. मंत्री महोदयांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.
Post a Comment