निशाची आकाशाला गवसणी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनने दिला मदतीचा हात

 


अजूनही अनेक कुटुंबात मुलींना दुय्यम स्थान आहे. मुलालाच वंशाचा दिवा मानले जाते. परंतु मुलीला कुटुंबाकडून योग्य वागणूक आणि सहकार्य मिळाले तर मुलीही कुटुंबाचा आधार बनू शकतात, इतरांचे आयडॉल ठरू शकतात.अंबरनाथ येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या निशा श्रीवास्तवने हे करून दाखवले आहे. आज तिच्या आई वडिलांनाच नव्हे तर तिच्या जिल्ह्याला तिचा अभिमान वाटत आहे. गरीब होतकरू मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी काम करणाऱ्या ठाण्यातील मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या मदतीने तिने थेट आकाशाला गवसणी घातली आहे.


ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे एका झोपापडपट्टीत राहणाऱ्या श्रीवास्तव कुटुंबातील निशा मोठी मुलगी. वडील शिंपीचे काम तर आई घर काम करून कुटुंब चालवायची. इतर भावंडांसोबत वडिलांनी निशालाही शाळेत घातले. घरची परिस्थिती बेताची असल्याने सगळ्यांचा खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागे. लोक रोज कपडे शिवायला येतीलच असे नाही, म्हणून आर्थिक चणचण कायमचीच. अशातच निशा कशीबसी दहावी झाली. तिच्या कुटुंबियात ती मोठी असल्याने तिच्या लग्नासाठी स्थळे येऊ लागली. वडिलांनीही तिच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात केली. पण निशाला शिकायचे होते. आई वडिलांचे आर्थिक दारिद्र्य घालवायचे होते, त्यामुळे ती जमेल तसे स्थळांना नकार देत होती. आईच्या मदतीने वडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होती. अशातच तिच्या मैत्रिणीकडून तिला ठाण्यातील मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या कामाबाबत समजले. तिने त्यांच्या मदतीने तिच्या आई वडिलांचे काऊंसलिंग झाले. आईच्या सहकार्याने निशाने अकरावीत प्रवेश घेतला. बघता बघता बारावी झाली. वडिलांच्या तुटपुंज्या कमाईने घर चालत नाही हे पाहून निशानेही मॅजिक बस इंडिया फाउंडेशन मदतीने काम करून शिक्षण सुरु ठेवले. ठाणे येथील ऑल-गर्ल्स लाइव्हलीहुड सेंटरमध्ये सामील झाली. 45 दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण घेतले. पहिल्या नोकरीच्या काळात तिने संतोषजनक कामगिरी केल्याने प्रोमोशन्स आणि इन्सेंटिव्ह्समुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला. तिने मॅजिक बससोबत राहण्याचा निर्णय घेत नोकरी करत पदवीधर होण्यापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आता ती भारतातील एका प्रसिद्ध कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत आहे. भारत आणि देशाबाहेरच्या कामाची जबाबदारी पार पाडत आहे. आई वडिल, भावंडांना झोपडपट्टीतून बाहेर काढून तिने स्वतःच्या कमाईतून घेतलेल्या फ्लॅटमध्ये कुटुंबाला राहायला घेऊन गेली आहे. आपली मुलगी मोठी साहेब झाल्याचे पाहून आता वडिलांनाही अभिमान वाटत आहे. तिच्या श्रीवास्तव कुटुंबात ती सर्वात जास्त शिक्षित आणि यशस्वी मुलगी बनली असल्याने तिच्या श्रीवास्तव कुटुंबातील आणि गावातील लोकांची आदर्श ठरळीबाहे. तेथील लोकं आता त्यांच्या मुला- मुलींना निशाचे उदाहरण देऊ लागले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत