अनधिकृत इमारतींवर कारवाई साठी आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा ठाणे काँग्रेस चे आमरण उपोषण
ठाणे(प्रतिनिधी): ठाणे शहरामध्ये खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील अधिकारी कुठलीही ठोस कारवाई न करता टोलवाटोलवी करतात. प्रशासनातील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या भूमिकेविरोधात ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयासमोर काही दिवसापूर्वी लक्षवेधी आमरण उपोषणास करण्यात आले होते.या आंदोलनाची प्रशासनाकडून तातडीने दखल घेत प्रभाग समिती लगत नाल्यावर बांधलेल्या एका अनधिकृत इमारतीच्या ठिकाणी पाडकाम करण्यात येऊन ही इमारत पूर्णपणे जमीन दोस्त करण्याचे व इतर इमारतींवर देखील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले
परंतु प्रत्यक्षात मात्र प्रभाग समिती पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व नाल्यावर बांधलेल्या या इमारतीला अभय दिल्याने जो पर्यंत ही इमारत जमीनदोस्त करण्यात येत नाही व इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाईची भूमिका प्रशासन घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
तसेच यावेळी प्रभाग समिती समोर चालू असलेल्या दुसऱ्या साखळी उपोषणाबाबत बोलताना ते म्हणाले की वर्तक नगर नाक्यावर पीपीपी योजना जाहीर होऊन चार वर्षे झाली .याबाबत महासभेच्या ठराव झाला असून आयुक्तांची मंजुरी देखील आहे. परंतु त्या ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे राजकीय दबावापोटी तोडली जात नाहीत. त्यामुळे न्यायासाठी ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागते ही शरमेची बाब आहे.यांना देखील न्याय न मिळाल्यास आयुक्तांच्या दालना समोर उपोषणास बसेन.म्हणूनच अनधिकृत बांधकामांना सातत्याने अभय देत स्वतःची घरे भरणारे जे कोणी अधिकारी असतील त्या सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी यावेळी केली आहे.
यावेळी ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे, यांच्यासह महेंद्र म्हात्रे निशिकांत कोळी भालचंद्र महाडिक रवी कोळी स्मिता वैती ,संगीता कोटल, विनीत तिवारी, अजिंक्य भोईर, नीलेश पाटील,राजू शेट्टी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment