ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींकडे


मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे सोपवण्यात आला असून, गुरुवारी त्यांनी हा पदभार स्विकारत विभागातील प्रलंबित व सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. 



मुंबई शहरापुरती मर्यादित असलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना विस्तारत ठाणे शहरासह महानगर क्षेत्रातील इतर उपनगरांमध्ये लागू करण्यात आली आणि त्या अनुषंगाने २०२० मध्ये स्वतंत्र ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची स्थापना करण्यात आली. दरम्यान, या विभागाच्या कारभारात सातत्याने बदल झाल्याने स्थैर्य हरवल्याचे चित्र होते. सुरुवातीला सतिश लोखंडे यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती, त्यानंतर परग सोमण यांनी २०२३ मध्ये पदभार स्वीकारला, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची वर्धा येथे बदली करण्यात आल्याने हे पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि प्रशासकीयदृष्ट्या कुशल अधिकारी म्हणून संदीप माळवी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे.


ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी सारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण आणि पुनर्वसनाचे आव्हान लक्षात घेता, या विभागाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची गरज असून, माळवी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रकल्प, पुनर्वसन प्राधान्यक्रम आणि रहिवाशांच्या समस्यांचा आढावा घेतला. शासनाच्या उद्दिष्टांनुसार अधिक गतिमान व पारदर्शक कारभार ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत