मराठी भाषिक पंतप्रधानासाठी तामिळी नागरिकाचे महाराष्ट्र भ्रमण
ठाणे- भारताचा आगामी पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, यासाठी तामिळनाडू राज्याचे शिवा अय्यर नामक नागरिक महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पिंजून काढणार आहेत. शुक्रवार (20) पासून त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोहिमेला सुरुवात केली असून शनिवारी पालघरला गेले, त्यानंतर नाशिक आणि पुढे राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यात जाऊन तेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांना या मोहिमेत सामील करून घेत ही चळवळ दिल्ली पर्यंत पोचवणार आहेत.
महाराष्ट्र राज्याने अगणित शौर्यवानांना जन्म दिला आहे. देशाला विकासाची, शिक्षणाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची वाट दाखवली आहे. राज्याने देशाला शौर्याचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज दिले आहेत, महिलांना शिक्षित करणाऱ्या सावित्रीमाई फुले आणि सामाजिक समता निर्माण करणारे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिले आहेत. परंतु देशाला मार्गदाता ठरलेला महाराष्ट्र पंतप्रधान पदापासून मात्र आजपर्यंत वंचित राहिलेला आहे. ही विद्वानांची भूमी असतानाही या भूमिला मराठी पंतप्रधानाचा उमेदवार, दावेदार मिळालेला नाही. म्हणूनच या देशाचा येणारा पंतप्रधान मराठीच असावा असा आग्रह देशातील तमाम जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शिवा कृष्णामूर्ती अय्यर या जेष्ठ नागरिकाने राज्यभरात फिरण्याची मोहीम सुरु केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या पंतप्रधान पदाची माळ अमराठी माणसाच्याच गळ्यात पडली आहे. महाराष्ट्र या माळेसाठी पात्र नाही का? असा सवाल अय्यर यांनी उपस्थित केला आहे. जर खसदारांच्या संख्या बळाच्या आधारावर एखादे राज्यच जर अनेकदा पंतप्रधान पद भूषवीत असेल तर हे इतर राज्यांसाठी योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्रासारखे जागतील नकाशावरील विकसित राज्यावर तो अन्याय आहे असे वाटत असल्याचे देखील अय्यर म्हणतात.
शिवा अय्यर हे 50 वर्षांपासून डोंबिवलीमध्ये राहतात. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी पहिले जय महाराष्ट्र त्यानंतर सर्व काही असा मराठी बाणा देखील त्यांनी दाखवून दिला. अय्यर यांनी शुक्रवार (ता. 20) पासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मराठी भाषिक पंतप्रधान या मोहिमेला सुरुवात केली आहे. हातात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांति ज्योती सावित्रीमाई फुले आणि संविधान निर्माते, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबीरी असलेले बॅनर घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारावर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या अधिकारी, नागरिकांसोबत या विषयावर संवाद साधून या मोहिमेला पाठींबा आहे का असा सवाल करत होते.
महाराष्ट्रातला मराठी भाषिक पंतप्रधान कोण असावा असे अय्यर यांना विचारले असता नितीन गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हे पंत प्रधान झाले तरी चालतील, परंतु नाना पाटेकर सारखी व्यक्ती या पदावर बसवली तर दिल्लीत जे अरविंद केजरीवाल यांनी करून दाखवले ते काम नाना पाटेकर महाराष्ट्रात, देशात करून दाखवू शकतात. त्यामुळे नाना पाटेकर यांसारखी महाराष्ट्रातील व्यक्ती या पदावर बसवायला हवी अशी इच्छा प्रश्नाला उत्तर देताना अय्यर यांनी बोलून दाखवली. तर गुजरातला 4 वेळा पंतप्रधान पद मिळाले.u उत्तर प्रदेशाला 11 वेळा मिळाले. आता रोटेशन पद्धतीने महाराष्ट्राला हे पद मिळाले पाहिजे असेही अय्यर म्हणाले.
Post a Comment