ठाणे महापालिका क्षेत्रात आता ५० ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई


• आधीच्या २५ ठिकाणात झाली वाढ

•   विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेचा उपक्रम

         ठाणे  : वाढत्या उन्हाचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात आता एकूण ५० ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. क्रेडाई-एमसीएचआय यांच्या सहकार्याने या वाढीव २५ पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वूी, पहिल्या टप्प्यात येस चॅरिटेबल ट्रस्ट, जेव्हीएम चॅरिटेबल फाऊंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहभागातून २५ पाणपोई सुरू झालेल्या आहेत.


       नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी गेल्यावर्षी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. त्यानुसार, उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.


           आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाणपोई सुरू करण्यात आल्या. त्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार, पर्यावरण विभागाने क्रेडाई-एमसीएचआय या संस्थेच्या सहकार्याने आणखी २५ तात्पुरत्या पाणपोई सुरू केल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. नागरिकांच्या सोयीसाठी या ५० ठिकाणी पाण्याचे मोठे माठ आणि ग्लास 

ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित स्वयंसेवी संस्था करीत आहे. 


          कोपरी बस स्टॉप-हनुमान मंदिरासमोर, सिडको स्टॉप-मंदिराजवळ, खोपट रिक्षा स्टॅण्डजवळ, गावदेवी पार्किंग, जांंभळी नाका, आरटीओ-जेल जवळ, खोपट एसटी स्टॅण्ड, वंदना एसटी स्टॅण्ड, बी-केबीन, तीन हात नाका - रिक्षा स्टॅण्ड, घोसाळे तलावाजवळ, कॅडबरी सिग्नल-शेअर रिक्षा स्टॅण्ड, वृंदावन बस थांबा, गोकूळनगर बस थांबा, कॅसल मिल सर्कल, १६नंबर- शेअर रिक्षा स्टॅण्ड, मानपाडा चौक - टेम्पो स्टॅण्ड, ढोकाळी - शेअर रिक्षा स्टॅण्ड, मानपाडा-टायटन हॉस्पिटलसमोर, वसंत विहार बस थांबा, शास्त्रीनगर नाका, दिवा महोत्सव नाका, दिवा-आगासन रोड, खर्डीगाव-खर्डीपाडा, दिवा-शीळ रोड-शीळफाटा या ठिकाणी नव्याने तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.


           तर, यापूर्वी, ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, एमआयडीसी-अंबिका नगर नं. ३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस बस थांबा, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकूम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन रोड, ९० फूट रस्ता-खारेगाव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर पोलीस चौकी-मुंब्रा, लोकमान्य डेपो, मध्यवर्ती कारागृहाच्या मागे- राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्री नगर नाका, बाळकूम येथे यापूर्वी तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत