आरोग्य सेवेचे सशक्तीकरण 'मिशन मोड'वर

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व सर्वसमावेशक करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने आरोग्य उपकेंद्रांपासून ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंतच्या संस्थांचे बळकटीकरण ‘मिशन’ मोडमध्ये राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले.


मुख्यमंत्री म्हणाले की, कर्करोग उपचारांसाठी केमोथेरपी, रेडिएशन थेरपीसह एकात्मिक संदर्भ सेवा विकसित केली पाहिजे. त्यासाठी प्रभावी कार्यपद्धती आणि ठराविक कालमर्यादा आवश्यक आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांना संयुक्तपणे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले असून, नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबत संलग्न रुग्णालयांमध्ये वाढती लोकसंख्या व रुग्णसंख्येचा विचार करून स्वतंत्र रुग्णालय उभारणीचे निर्देश देत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी धाराशिव येथे नव्याने रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मांडला. यासोबतच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना काही कालावधीसाठी शासकीय रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक करण्याबाबतही त्यांनी विचार करण्याचे निर्देश दिले.


या बैठकीत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली, अवयव प्रत्यारोपण संस्था, तसेच विविध जिल्ह्यांतील रुग्णालयांची उभारणी व उपकरणे खरेदी यावरही चर्चा झाली. बैठकीस मंत्री प्रकाश आबिटकर, आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत