आयुर्वेदाच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना बळी पडू नका: डॉ. ऐश्वर्या फाटक
ठाणे : वर्षातून तीन वेळा देत तरी पंचकर्म करा जसे आपण बाह्य स्वच्छतेसाठी आग्रही असतो तसे शरीराच्या आतील स्वच्छतेसाठी देखील काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावर आयुर्वेद किंवा हर्बलच्या नावाखाली जी उत्पादन विकली जातात त्याला बळी पडू नका असा सल्ला आयुर्वेद तज्ञ डॉक्टर ऐश्वर्या फाटक यांनी दिला.
रोटरी क्लब ऑफ ठाणे सिटी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे होरायझनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आज निळकंठ गुड्स येथील ठाणे महानगरपालिकेच्या उद्यानात महिलांसाठी विशेष आरोग्य सत्राचे आयोजन
केले होते. यावेळी रोटरीतर्फे पत्रकार प्रज्ञा म्हात्रे, मधुरा जोशी, पलक टिकमणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रज्ञा म्हात्रे यांनी सायकलिंगमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात कशी सुधारणा होते याचे महत्त्व पटवून दिले. दिवसाला कमीत कमी पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास तरी सायकलिंग करा असा सल्ला दिला. कार्यक्रमाला रोटरी क्लब ठाणे सिटीचे अध्यक्ष श्रीकृष्ण भट, असिस्टंट गव्हर्नर अनुजा टिपणीस, योगेश प्रसादे, रवी कुलकर्णी व इतर उपस्थित होते. यावेळी वृषाली जोशी यांनी उपस्थित महिलांचे योगचे सत्र घेतले. डॉ. फाटक पुढे म्हणाल्या की, दुर्दैवाने कॅन्सरशी संबंधित चाचण्या आपण करत नाही. आता चाळीसच्या आतच तपासण्या सुरू झाल्या आहेत. आयुर्वेद आणि योग हे कायम आयुष्यामध्ये ठेवा त्यामुळे तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगता येते. योग हा जगण्याचा एक मार्ग आहे. शारीरिक आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी योगा सर्वोत्तम उपाय आहे. 40 ते 50 वर्षातच स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे प्रत्येक घरात मधुमेह किंवा कॅन्सरचा रुग्ण आढळून येतो एका अभ्यासात असे सांगितले आहे की स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण 50% नी वाढले आहे मात्र हे सगळे अचानक घडत नाही. त्यामुळे कोणतेही लक्षण आढळल्यास आरोग्याची तपासणी तातडीने करून घ्या असे सल्ला डॉ. फाटक म्हणाल्या.
Post a Comment