टॅग च्या ‘तिन्ही सांजा’ ने पटकावला उत्तरार्ध सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा बहुमान

 


जागतिक रंगभूमी दिनी म्हणजेच २७ मार्च २०२५ रोजी  पन्नाशीपार तरुणांच्या दमदार कलाकृतींनी सजलेली उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दिमाखात पार पडली. ठाणे आर्ट्स गिल्ड च्या 'तिन्ही सांजा' एकांकिकेने प्रथम एकांकिकेचा बहुमान पटकावला.  तसेच माय स्टेज पुणे संस्थेच्या सांजसावल्या ने द्वितीय, ब्रोकन कॅमेरा मुंबई च्या वन सेकंड्स लाईफ ने तृतीय तर सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट च्या पन्नाशीची ऐसी तैसी एकांकिकेने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. कलेला वयाचं बंधन नसतं ही टॅगलाइन असलेल्या या एकांकिका स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे खास 50 वर्षे आणि पुढील वयोगटासाठी ही स्पर्धा मोरया इव्हेंट अँड एंटरटेनमेंट संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. 


अंतिम फेरीसाठी लेखक - दिग्दर्शक स्वप्निल जाधव , अभिनेत्री शुभांगी भुजबळ व दिग्दर्शक - अभिनेता अद्वैत दादरकर हे परीक्षक होते.. इतकी सुंदर संकल्पना असलेल्या असलेल्या एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आल्याने समाधान वाटल्याचं आणि  पन्नाशी पल्याडचे असले तरी तरुणांना लाजवतील असा सर्वांचा उत्साह दिसून आल्याने आनंद वाटल्याचे अद्वैत दादरकर याने सांगितलं..

शिवाय अधिकाधिक संस्थांनी पुढील वर्षी या स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि खासकरून ज्या वयोगटासाठी ही स्पर्धा आहे त्या पन्नाशीपार वयोगटाच्या आयुष्यातील विविध बाबींवरच्या आजच्या काळातील विषयांवर, सादरीकरणाच्या आजच्या शैलीतून भाष्य व्हावं असं मोलाचं मार्गदर्शनही परीक्षकांच्या वतीने अद्वैत ने केलं.. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेच्या नरेंद्र बेडेकर यांनी टीम मोरयाच्या तरुण मुलांनी अशी स्पर्धा भरवण्यामागच्या कल्पकतेचं आणि मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं.. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सॉफ्ट कॉर्नरचे एम. डी. व सी.इ.ओ.दिलीप कुलकर्णी यांनी अंतिम फेरीतील सर्व सादरीकरणांचं कौतुक करताना टीम मोरयाचा हा स्तुत्य उपक्रम असून उत्तरोत्तर ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या अधिकाधिक रंगकर्मींपर्यंत पोहोचेल आणि लोकप्रियता प्राप्त करेल असा विश्वास असल्याचं सांगितलं.. तरुण वयात राहून गेलेल्या काही गोष्टी करायला वा नव्याने जगायला ही स्पर्धा उत्तम मंच आहे असं विश्वास सर्वांनी व्यक्त केला..


या एकांकिका स्पर्धेला अभिनेता संदीप रेडकर, अभिनेत्री संजीवनी समेळ, अभिनेत्री शीतल कुळकर्णी - रेडकर व ठाण्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेचे पदाधिकारी विद्याधर ठाणेकर  , नरेंद्र बेडेकर हेही उपस्थित होते.. सर्वच पाहुणे, स्पर्धक, प्रेक्षक यांनी श्री. रवि मिश्रा यांच्या उत्तरार्ध या संकल्पनेचं आणि मोरयाच्या सर्व टीमने पन्नाशीपार रंगकर्मींसाठी स्पर्धा उत्तमरित्या आयोजित केल्याबद्दल कौतुक केलं. मोरया इव्हेंट अँड एंटरटेनमेंट चे प्रमुख प्रफुल्ल गायकवाड आणि त्यांचे सहकारी कल्पिता पावसकर व शिशिर कोण्णूर यांनी स्पर्धेला लाभलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व नजिकच्या काळात टीम मोरयाच्या इतर उपक्रमांनाही मायबाप रसिकांकडूनअसाच भरघोस प्रतिसाद मिळावा ही आशा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत