ठाण्यात 8 मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
ठाणे (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आसरा फाउंडेशन आणि मित्र मेळा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 8 मार्च 2025 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा श्री मावळी मंडळ हायस्कूल, धोबी आळी, चरई, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत होणार आहे.
“कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र” या ध्येयाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात अनेक नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये थेट नोकरीच्या मुलाखती (ऑन द स्पॉट जॉब इंटरव्ह्यू) घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा आणि मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि विविध कर्ज योजनांची (PMEGP, CMEGP, मुद्रा लोन, SEDD मनी योजना) माहिती तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मार्गदर्शन उपलब्ध असेल.
या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे संयुक्त आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आसरा फाउंडेशन आणि मित्र मेळा सामाजिक संस्था या आयोजकांनी केले आहे.
Post a Comment