नवी मुंबई महानगरपालिका मेडिकल सायन्सच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटमध्ये 22 विद्यार्थ्यांचा प्रवेश


 

नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी योगदान

 



नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था (Post Graduate Institute of Medical Science)’ केंद्र व राज्य सरकारच्या विविध परवानग्या तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात National Medical Commission यांचीही परवानगी प्राप्त होऊन प्रत्यक्षात सुरू झाली असून 5 शाखांमध्ये 22 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ व वाशी रूग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणा-या एमबीबीएस डॉक्टर्सची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्थेस (Post Graduate Institute of Medical Science) ‘मेडिसीन (4 सीट्स)’, ‘ऑर्थोपॅडीक (2 सीट्स)', ‘गायनॅकोलॉजी (8 सीट्स)' व ‘पेडियाट्रिक (4 सीट्स), सर्जरी (4 सीट्स) ’ अशा 5 शाखांमध्ये 22 जागांची परवानगी प्राप्त झाली आहे. त्या सर्व 22 जागांवर विद्यार्थी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झालेली असून नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय व वाशी येथील सार्वजनिक रूग्णालय याठिकाणी पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्थेत सन 2024-25 वर्षासाठी शिक्षण सुरू झाले असून ही संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली आहे.

त्याचप्रमाणे ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णलयातही डिएनबी  (Diplomate of National Board) पदविकेचे गायनॅकोलॉजी व पेडियाट्रिक शाखांचे प्रत्येकी 2 असे 4 विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.

ही पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी महानगरपालिकेच्या वाशी व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व आवश्यक कर्मचारीवर्गही  उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे.

या संस्थेमध्ये एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होईल. या माध्यमातून महानगरपालिकेच्या आऱोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार आहे व नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत