इंटरनेटच्या सुरक्षित वापराबद्दल सजग राहणे आवश्यक'


अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे प्रतिपादन

सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने कार्यशाळेचे आयोजन

       ठाणे (११) : आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही. मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी या सगळ्याचा डेटा गोळा केला जात असतो. अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणे, त्याबाद्दल सजग असणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे. त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले.


        ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, एनआयसी यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती तंत्रज्ञान) सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे आदी उपस्थित होते.


       फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. या वर्षी, 'सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम इंटरनेट' या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचे देशभरातील सर्व जिल्ह्यांत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठे शस्त्र आहे. सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचे श्री. भामरे यांनी स्पष्ट केले.


       विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी, यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जात आहे. मंगळवारी झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यशाळेच प्रास्तावित उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी केले. तर, प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले.


       फिशिंग, व्हिशिंग, आयडेंटीटी चोरी, आर्थिक गुून्हे, लॉटरीचे जाळे, बनावट अॅप्स, गुंतवणुकीचे गुन्हे आदींची माहिती शेंडे यांनी दिली. तसेच, एनआयसीने तयार केलेले काही व्हीडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले. पासवर्डची सुरक्षितता, डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा आदींबद्दल यांनी माहिती दिली. इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी, सावधगिरी याबद्दलही त्यांनी विवेचन केले. 


       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत