उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 'एकनाथ हीरक ६० आरोग्य वर्ष' म्हणून होणार साजरे

 

६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरात 'आरोग्य महायज्ञ २०२५'



ठाणे : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यंदाच्या ६० व्या वाढदिवसापासून म्हणजे ९ फेब्रुवारी २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ हे वर्षं 'एकनाथ हीरक ६० आरोग्य वर्ष' म्हणून साजरे करण्यात येणार आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यभरात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जाणार आहेत. 


'आरोग्य हीच ईश्वर सेवा' मानत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांच्या सेवेसाठी कायम तत्पर असतो. या कक्षाने अनेक गरजू रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोग्य हा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामुळेच  एकनाथ शिंदे यांचे याकडे विशेष लक्ष असते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी दिलेला आरोग्य सेवेचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक १४ मध्ये आजूबाजूच्या स्लम परिसरातील नागरिकांसाठी शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, मा. नगरसेवक दिलीप बारटक्के आयोजित गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठाणे महापालिका शाळा क्रमांक १२० मैदान, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, ठाणे येथे 'आरोग्य महायज्ञ २०२५' आयोजित करण्यात आला आहे.


या उपक्रमासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे मोफत उपचार, नेत्र चिकित्सा, सामान्य तपासणी, स्त्रीरोग, बालरोग, हाडांचे विकार, इसीजी, रक्तदाब, मधुमेह, नेत्रतपासणी, मोफत औषध वाटप, सिद्धी विनायक हॉस्पिटल, वेदांत कॉम्प्लेक्स, वर्तकनगर, ठाणे तर्फे मोफत हृदयरोग उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिर, किडनी स्टोन, कार्डिओलॉजिस्ट सल्ला, सर्व प्रकारची आरोग्य तपासणी, गरज असल्यास 'टूडी इको' सिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज, त्याचप्रमाणे गरज असल्यास अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी होणार आहे. त्याचप्रमाणे डिग्नीटी फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी सुविधा, ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी मेमोग्राफी (ब्रेस्ट कॅन्सर) चेकअप शिबिर, रोटरी क्लब ऑफ भांडुपतर्फे मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. गरजू रुग्णांना नक्कीच हे वरदान ठरणार आहे.


या महत्त्वाकांक्षी आरोग्य महायज्ञ उपक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी आपले मोलाचे सहकार्य देखील अपेक्षित आहे. या उपक्रमास भेट द्यावी, सहकार्य करावे, अशी विनंती दिलीप बारटक्के यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत