ठाण्यातील सर्वोत्कृष्ट ११ हौसिंग सोसायट्यांचा `क्रेडाई-एमसीएचआय'च्या प्रदर्शनात सन्मान
सेंट्रम-आयटी पार्क सोसायटीला दीड लाखांचे बक्षीस
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका क्षेत्रातील उत्कृष्ट हौसिंग सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी `क्रेडाई-एमसीएचआय' ठाणे यांच्याकडून यंदाही शहरातील ११ सर्वोत्कृष्ट हौसिंग सोसायट्यांचा सन्मान करण्यात आला आहे. ठाणे हौसिंग फेडरेशनच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रहिवाशी सोसायट्यांच्या स्पर्धेत ८५ सोसायट्यांमधून वागळे इस्टेट येथील सेंट्रम-आय टी पार्कने प्रथम क्रमांक पटकावला. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते विजेत्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
`क्रेडाई-एमसीएचआय'कडून ठाणे शहरात अनेक विधायक उपक्रम राबविले जात आहेत. कोरोना आपत्तीच्या काळात ठाण्यातील रुग्ण व नागरिकांच्या मदतीसाठी एमसीएचआयने पुढाकार घेतला होता. शहरातील नागरिकांना उत्तम सुविधा व उपक्रम राबविणाऱ्या सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी `क्रेडाई-एमसीएचआय'चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी गेल्या वर्षापासून उत्कृष्ट सोसायट्यांना पुरस्काराची कल्पना मांडली होती. त्यानंतर ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांच्या सहकार्याने स्पर्धा सुरू केली होती. यंदाही घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना एमसीएचआयच्या प्रॉपर्टी प्रदर्शनात आज सन्मानित करण्यात आले.
वागळे इस्टेट येथील सेंट्रम आय टी पार्क सोसायटीला दीड लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. तर कोलशेत रोड येथील रिजन्सी हाईट्स सोसायटीला एक लाख रुपयांचे द्वितीय, हिरानंदानी इस्टेट येथील ब्रूकहिल सोसायटी व माजिवडा येथील अथेना रुस्तमजी सोसायटीला तृतीय क्रमांकाचे प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस देण्यात आले. तर प्रत्येकी ११ हजार रुपयांच्या उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी वर्तकनगर येथील दोस्ती वृष्टी एबीसी (दोस्ती विहार), पाचपाखाडी येथील सेंटर पॉईंट, माजिवडा येथील पृहा, कोलबाड येथील रुणवाल नगर प्लॉट बी, लुईसवाडी येथील श्री नंदनवन अपार्टमेंट, कापूरबावडी येथील नीळकंठ पाम सोसायटीला सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला `क्रेडाई'चे अध्यक्ष बोमन इराणी, उपाध्यक्ष दीपक गोरडिया, `क्रेडाई-एमसीएचआय' ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, संदीप माहेश्वरी, भावेश गांधी, ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, सचिन मिराणी, आदी उपस्थित होते.
`क्रेडाई-एमसीएचआय' ठाणे यांच्याकडून आयोजित केलेले प्रदर्शन वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रदर्शनाबरोबरच सामाजिक बांधीलकी म्हणून राबविलेल्या उपक्रमांबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक केले. तर या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील हौसिंग सोसायट्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याबद्दल आमदार निंरजन डावखरे यांनी आनंद व्यक्त केला. उत्कृष्ट आयोजनाबद्दल विक्रांत चव्हाण यांनी `एमसीएचआय'च्या पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.
Post a Comment