ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांना 'स्व. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार' देऊन विधायक पत्रकारितेचा गौरव
माजी राज्यपाल रामभाऊ नाईक यांचे 'पत्रकार दिन' समारंभात गौरवोद्गार
# मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे मुंबईत वितरण!
मुंबई ( प्रतिनिधी ) राज्य सहकारी बँकेतील अधिकारीपदावरील जबाबदारी चोखपणे बाजावतानाच, मुंबईतील विविध बड्या वृत्तपत्रातून पत्रकारिता करताना अनिलराज रोकडे यांनी वसई विरार, तसेच पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडल्याचे मी अनेक वर्षे जवळून पाहात आलो आहे. ज्येष्ठ पत्रकार रोकडे यांना गुणवत्ता सांभाळून बातमीला तत्परतेने न्याय देताना मी स्वतः अनुभवलेले असून, वास्तव आणि समतोल लेखनासाठी सतत धडपडणाऱ्या एका हाडाच्या पत्रकारास 'स्व. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार' देऊन, विधायक पत्रकारितेचा गौरव केल्याबद्दल मी, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे आणि रोकडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार माजी राज्यपाल, तथा माझी केंद्रीय मंत्री रामभाऊ नाईक यांनी 'पत्रकार दिन' समारंभात दादर येथे बोलताना काढले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा 24 वा वर्धापन दिन आणि यंदाचा 'पत्रकार दिन' सोहळा सोमवारी, दि. 6 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृहात संपन्न झाला. या दुहेरी निमित्ताने पत्रलेखकांचे राज्सस्तरीय संमेलनही यावेळी आयोजित करण्यात आले होते. पद्मभूषण रामभाऊ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे व दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ लेखक रेमंड मच्याडो यावेळी मंच्यावर उपस्थित होते.
या सोहळ्यात यंदाचा ‘दर्पणकार स्व. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’ वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष व कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष, तथा ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांना प्रदान करण्यात आला. तर ‘कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार’ दै. परभणी शिल्पकारचे संपादक भूषण मोरे यांना देण्यात आला. त्याचबरोबर 'उद्योगभूषण पुरस्कार' 'गार्डवेल इंडस्ट्रीज'चे सीएमडी विल्यम अँथनी तुस्कानो आणि 'ई- बायोटोरियम नेटवर्किंग'चे सीएमडी सागर जोशी यांना, तसेच 'आरोग्यभूषण पुरस्कार' डॉ. प्रवीर पारकर आणि सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार 'ऋतुरंग दिवाळी अंका'चे संपादक अरुण शेवते व 'उद्योग-रत्न' पुरस्कार उद्योजिका सौ. भारती पवार यांना बहाल करण्यात आला. राज्यातील नामवंत पत्रकारांना 'पत्रकार भूषण' आणि अन्यही विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणार्या व्यक्तींना पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना पद्मभूषण रामभाऊ नाईक पुढे म्हणाले की, राजकीय कार्यकर्त्याचे जीवन कसे घडत गेले. हा विषय देऊन एका मोठ्या दैनिकाने माझी लेखमाला छापली होती. त्या लेखांचे संकलन असलेले 'चरैवेति! चरैवेति!!' या नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्याच्या भारतीय विविध दहा भाषा, तीन विदेशी भाषांमध्ये, तसेच दृष्टीहीनांसाठी तीन भाषांत ब्रेल लिपीमध्ये अशाप्रकारे 16 भाषांमध्ये आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आहेत. वृत्तपत्र लेखक म्हणून हे विक्रमी यश मला वाचतांमुळे लाभलं. असेच वाचकांचे प्रेम या मेळाव्यास उपस्थित वृत्तपत्र लेखकांनाही लाभावे, अशी माझी शुभेच्छा आहे.
वृत्तपत्रे नियमित वाचून, जागृततेने विचार मंथन करणाऱ्या पत्रलेखकांबद्दल मला आदर आहे. वृत्तपत्र लेखक, पत्रकार आणि वाचक यांचा संगम आणि संवाद वैचारिक व्याख्यानमालांमधून होत असतो. कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय मांडण्याचे कसब त्यातून मिळते. परंतु बौद्धिक देणारी व्याख्यानमाला संस्कृती लयास जात असून, मात्र तिचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही नाईक यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी, ज्येष्ठनेते रामभाऊ नाईक यांचे आणि त्यांच्या कार्यकाळातील राजकीय सकारात्मक वातावरणाचे कौतुक आपल्या भाषणात करतानाच, विद्यमान राजकीय घडामोडींवर कडक शब्दात आसूड ओढले. सध्याचा काळ हा रामायणाचा नसून, वाल्मिकीचा काळ आहे. देशामध्ये गांधी आहेत, पण महात्मा नाहीत, चव्हाण आहेत, पण यशवंतराव नाहीत. महाराष्ट्राचे हल्लीचे राजकारण रसातळाला गेले असून, एकंदरीत विदारक चित्र पाहता, असा कोणी नेता दिसत नाही, जो विधायक समाजकारण आणि राजकारण करून महाराष्ट्राला पुढे प्रगतीवर नेईल.
आजची आधुनिक पत्रकारिता, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्यातील स्पर्धा, पत्रकारितेत 'एआय' ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) चा वापर तारक की मारक?, पत्रकारिते पुढील नवी आव्हाने आदी विषयांवर ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे व दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी आपापली मते मांडून उपस्थितांचे प्रबोधन भाषणातून यावेळी केले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी प्रस्ताविक करताना, संस्थेने आता रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, पुढील वर्षभरात त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी शासनाच्या अधिस्वीकृती समितीच्या कोकण विभागाचे अध्यक्ष श्रीकांत चाळके, दै. वसई विकास चे संपादक विजय खेतले, 'लीलाई'च्या संपादिका सौ. पूजा रोकडे, 'सनातन संस्थे'च्या सौ. मंगला राऊत, पत्रकार संतोष गायकवाड व चंद्रकांत भोईर, संघाचे पदाधिकारी शंकर राहाणे व शंकर शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुबोध जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन संघाचे कार्यवाह संतोष धोत्रे यांनी केले.
Post a Comment