अमीत शहांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन
बाबासाहेब आंबेडकर हे आमचे पॅशन- डाॅ.जितेंद्र आव्हाड
ठाणे - "आंबेडकर... आंबेडकर असे म्हणणे फॅशन झाली आहे", असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केले होते. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने ठाणे स्टेशन परिसरात जोरदार निदर्शने केली. *या प्रसंगी, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, आंबेडकर हे नाव आमची पॅशन आहे. अमीत शहा हे ज्या पक्षात आहेत; त्यांच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आता शहांच्या विधानाने भाजपच्या मनात काय आहे, ते उघडकीस आले आहे, अशी टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, आप, सपा आदी पक्षांनी ठाणे स्टेशन परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमीत शहा यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. याप्रसंगी आंदोलकांनी मोदी - शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "तडीपार तो तडीपार, त्याला काय समजणार घटनाकार, संविधान आमचा अभिमान, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान, अमीत शहा मुर्दाबाद" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या प्रसंगी, परभणीत संविधान प्रतिकृतीची मोडतोड करणारा माणूस विकृत होता, असे मुख्यमंत्री सांगत असतील तर संसदेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यास काय म्हणाल, असे पत्रकारांनी विचारले असता, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आम्ही हृदयातून घेत असतो. आमच्यासाठी ते नाव पॅशन आहे. कारण, त्यांच्यामुळेच आम्हा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. स्वर्ग आणि नरक कुणीच पाहिलेले नाही. मात्र, इथल्या नरकातून माणुसकीचा स्वर्ग बाबासाहेब आंबेडकर यांनीच आम्हाला दाखविला आहे. अमीत शहा यांच्या विधानातून भाजपच्या मनात काय आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. 1950 साली भाजपच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आजही त्यांना मनातून संविधान नको आहे. म्हणूनच ते अशी विधाने करीत आहेत, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
यावेळेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, रचना वैद्य, राहुल पिंगळे, रवी कोळी, राजेश साटम, राजेश कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
*सूर्यवंशी कसा मेला? राज्यभर बॅनर लावून प्रश्न विचारणार*
*सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळणार का? असे पत्रकारांनी विचारले असता, या सरकारला सोमनाथ सुर्यवंशीला न्याय द्यायचाच नाही. जे सरकार सुर्यवंशीचे निधन कसे झाले ते सांगायला तयार नाही. ते सरकार न्याय कसा देणार? आपण पहिल्या दिवसापासून हाच प्रश्न विचारत आहोत. आता आम्ही राज्यभर "सुर्यवंशी कसा मेला" असा प्रश्न विचारणारे बॅनर लावू, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.*


Post a Comment