आरोग्य विभागाच्यावतीने ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ मोहीम राबवणार


(जिल्हा परिषद, ठाणे)- केंद्र शासनाने २०२७ पर्यंत कुष्ठरोग रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे धोरण आखले आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने दि. १६ डिसेंबर, २०२४ ते २० डिसेंबर, २०२४ या कालावधीत ठाणे जिल्हा ग्रामीण व शहरी विभागामध्ये कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२४ अखेर ६०१ कुष्ठ रुग्णांची नोंद कुष्ठरोग विभागाने केली आहे. वेदना नसल्याने अनेकवेळा रुग्ण याआजाराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळेत निदान करावयाचे आव्हान कुष्ठरोग विभागाकडून करण्यात येत आहे. 

           ठाणे जिल्ह्यात आश्रमशाळा -४३, वसतिगृह - २८, बांधकामाच्या जागा - ५९३, विटभट्टी - ७३७, कारागृह – ३, अति जोखमीची ठिकाणे – १ हजार ९७६ येथील कामगार यांचे आशा व स्वयंसेवका मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्वरित कुष्ठरोगाचे निदान करून नजदिकच्या शासकीय संस्थेत / आरोग्य केंद्रात त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहेत. या मोहिमेचे मूळ उद्दीष्ट वंचित विभागातील कुष्ठ रुग्णांना शोधून संसर्गाची साखळी खंडित करणे आहे.  

        कुसुम मोहीम प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. गीता काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला निर्देशित केले आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले असून जिल्ह्यातील मनुष्य बळाची माहिती घेवून त्यानुसार सुक्ष्म कृती आराखडा बनवून त्या प्रमाणे कुष्ठरोग शोध मोहिमेचे नियोजन करण्यात आलेले आहे. निवडलेल्या जोखीम ग्रस्त भागातील लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून मोहिमेचे सर्व स्तरावर प्रभावी संनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यात येणार आहे.      

कुष्ठरोगाची लक्षणे

- कुष्ठरोग जिवाणूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे.

- अंगावर असणारा फिक्कट, लालसर रंगाचा बधिर चट्टा व हाता पायामध्ये अशक्तपणा येणे ही कुष्ठ रोगाची प्रमुख लक्षणे आहेत.

- कानाच्या पळया जाड होणे व चेहरा लालसर, तेलकट व जाड होणे.

- त्वचेशी संलग्न मज्जा जाड व दुखऱ्या होणे. 

- कुष्ठरोग सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो.

कुष्ठरोगामुळे येणारी विकृती

*Grade I विकृती* : यामध्ये तळहाताला किंवा तळपायाला बधिरता येते. संवेदना नसल्याने गरम वस्तु पकडल्याने किंवा काही टोचल्याने तळ हाताला किंवा तळ पायाला जखमा पडू शकतात ज्या वर्षानुवर्षे जखम पुर्ण बरी होत नाही. 

*Grade II विकृती* : या प्रकारची विकृती डोळ्यांनी दिसण्यासारखी असते, जसे की हात पायाची बोटे वाकडी होणे, मनगट लुळे पडणे, पाय लुळा पडणे, तळहाताला तळपायाला जखमा पडणे, डोळ्यांच्या पापण्या पूर्णतः बंद न करता येणे अशा प्रकारच्या विकृती ग्रेड टु च्या कुष्ठरोगमध्ये येते.

       या बाबत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा समन्वय समितीच्या वतीने सर्व अतिजोखमीच्या भागात राहणार्‍या समाज घटकातील कुष्ठरोगाची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. गीता काकडे यांनी केले आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत