स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या संजय केळकरांना मंत्रिपद द्यावे!



भाजपा ठाणे शहर/जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे यांची मागणी..


ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून येत, विजयी हॅट्रिक साधणारे भाजपाचे संजय केळकर हे, स्वच्छ प्रतिमा असणारे आणि तळागाळातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारे लोकप्रतिनिधी, अशी त्यांची ओळख असून, अशा बहुजनहित जपणाऱ्या संजय केळकर यांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान देत, त्यांच्या ज्येष्ठत्त्वाचा सन्मान राखण्यात यावा, अशी आग्रही मागणी भाजपाचे ठाणे शहर/जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदारकी भूषविल्यानंतर, संजय केळकर यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक साधून आपले निर्विवाद नेतृत्त्व सिद्ध करुन दाखविलेले आहे. माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला, भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षात जी काम करण्याची संधी मिळालीय, ती केवळ संजय केळकर यांच्यामुळेच. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा नेता, अशी सर्वमान्य ओळख असणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी, सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक अशा श्रीस्थानकाला लाभलेला आहे आणि म्हणूनच ठाणे शहरातील आंबेडकरी जनतेची अशी मागणी आहे की, ठाणे विधानसभा मतदारसंघाचे ‘हॅट्रिक’वीर अशी ओळख निर्माण झालेल्या संजय केळकर यांना, मानाचे मंत्रिपद भूषविण्याची संधी देण्यात यावी. असेही राजेश गाडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


*दरम्यान,* आमदारकीची हॅट्रिक साधून, ठाण्यासारख्या सांस्कृतिक शहरात भाजपाची मुळे पूर्वीपेक्षाही अधिक घट्ट झाली असून, ठाणे महानगरपालिकेत आता कमळ फुलविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन राजेश गाडे यांनी यावेळी केले. गेल्या तीस वर्षांपासून राज्यात भाजपा-शिवसेना युती असूनही, ठाणे शहराचा महापौर, भारतीय जनता पक्षाच्या नशिबी नव्हता; मात्र, संजय केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, महापालिकेवर भाजपाचाच महापौर बसेल, याबाबत आपल्या मनात कोणताही संदेह नसल्याचा आत्मविश्वास गाडे यांनी यावेळी बोलून दाखवला. संजय केळकर हे उच्चशिक्षित, संयमी आणि अठरापगड जाती-समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत नेतृत्त्व असून, त्यांचे आजोबा बॅरिस्टर  बर्वे हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक आणि सहकारी होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, बर्वे यांनी बाबासाहेबांना साथ दिल्यामुळे तत्कालीन कर्मठांनी, त्यांना वाळीतही टाकले होते. कोकणस्थ ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात स्नेहभोजन आयोजित करुन, सामाजिक समतेच्या आड येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केल्याबाबत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 'बहिष्कृत भारत' या नियतकालिकात बॅरिस्टर बर्वे यांचे कौतुकही केलेले आहे. अशा, खऱ्याअर्थाने पुरोगामी वारसा लाभलेल्या घराण्यातून आलेल्या संजय केळकर यांना मंत्रिपद मिळाल्यास, ठाणे शहराचा विकास, मुलभूत सुखसोयी व नागरीसमस्या चुटकीसरशी सुटतीलच, त्याचबरोबर भविष्यातील खरीखुरी ‘स्मार्टसिटी’ म्हणून नावारुपाला येण्यासाठी, संजय केळकर यांना, ठाण्यातून मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी करतानाच, यासंदर्भात आपण एक ‘स्वाक्षरी-मोहीम’ राबविणार असल्याचेदेखील भाजपाचे ठाणे शहर/जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी, शेवटी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत