शाळा, मार्केट, उद्याने अशा विविध ठिकाणी मतदान करण्याविषयी जनजागृती
विधानसभा निवडणूकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत असून निवडणूक कार्यालयांच्या स्वीप पथकांप्रमाणेच महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांमार्फतही विविध समाज घटकांपर्यंत पोहचून 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यामध्ये आज नेरूळ विभागातील सेक्टर 25 जुईनगर येथील चिंचोली उद्यानात ज्येष्ठ नागरिक तसेच मॉर्नींग वॉकला येणा-या नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहचविण्यात आला. त्यातही विशेषत्वाने युवक व नवमतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदानाचे लोकशाहीतील महत्व विशद करीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
अशाच प्रकारे नेरूळ सेक्टर 8 येथील एल मार्केट परिसरात व्यावसायिक व ग्राहक यांच्यामध्येही मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. रामलीला मैदानात श्री ॲकेडमीमधील प्रशिक्षणार्थी युवक – युवतींमध्ये लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदानाचे महत्व याविषयी जाणीव जागृती करण्यात आली व त्यांनी मतदानाचा अधिकार कर्तव्यभावनेने बजावण्याविषयी सूचित करण्यात आले. सेक्टर 1 शिरवणे येथील महिला मंडळात जाऊनही मतदान करण्याविषयी आवाहन करण्यात आले. सर्वच ठिकाणी मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली व प्रतिज्ञेचे पालन करण्याविषयी सांगण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मतदानाचे महत्व प्रसारित व्हावे व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालक व परिचितांपर्यंत मतदान करण्याविषयीचा संदेश आणि आवाहन पोहचावे यादृष्टीने नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळांना विविध उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आज सेक्टर 9, वाशी येथील फादर ॲग्नेल स्कुलने मतदान जागृती या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 102 नेरूळ येथेही चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नमुंमपा शाळा क्र. 112 करावे यांनीही रांगोळी, पथनाट्य, वक्तृत्व आणि रॅली अशा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमार्फत मतदानाचा संदेश प्रसारित केला. नमुंमपा सीबीएससी शाळा क्र. 94 कोपरखैरणे येथे पोस्टर मेकींग स्पर्धा तसेच नमुंमपा शाळा क्र. 81 (उर्दू) खैरणे येथे चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. नमुंमपा शाळा क्र. 108, दिघा यांनीही जनजागृतीपर रॅली काढून परिसरात मतदानाविषयी जाणीव जागृती केली.
कोपरखैरणे विभाग कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित नागरिकांसह मतदानाची सामुहिक शपथ घेतली तसेच बेलापूर विभागातील सेक्टर 11 मार्केटमध्ये उपस्थित व्यावसायिक व ग्राहक तसेच वाहन दुरूस्ती दुकानांतील कामगार व वाहतुक पोलीस यांच्यासह मतदानाची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून 150 व 151 या नमुंमपा क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघाकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त स्वीप कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यामध्ये बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा वाशीचे विभाग अधिकारी श्री.सागर मोरे व ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी तथा उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे – पाटील यांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, उद्यान विभागाच्या उपआयुक्त श्रीम. नयना ससाणे, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, बेलापूर विभाग अधिकारी डॉ.श्रीकांत तोड़कर, नेरूळ विभाग अधिकारी श्री. जयंत जावडेकर, कोपरखैरणे विभाग अधिकारी श्री.सुनिल काठोळे, दिघा विभाग अधिकारी श्री.भरत धांडे आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सहभागी झाले.

Post a Comment